नवी दिल्ली : प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असल्याच्या चर्चांना पंकजा मुंडे यांनी पूर्णविराम दिला असला तरी समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतली. पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत आपण नाही तर समर्थक नाराज असल्याची भूमिका मांडली होती. यावेळी त्यांनी प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा होणंही योग्य असल्याचं म्हटलं होतं. दरम्यान राज्यात समर्थकांचं राजीनामासत्र सुरु असतानाच पंकजा मुंडे दिल्लीत दाखल झाल्या आहेत.
यावेळी त्या भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेणार आहेत. दिल्लीत भाजपाच्या राष्ट्रीय सचिवांची एक बैठक पार पडणार आहे . या बैठकीत पंकजा मुंडे सहभागी होणार आहेत. यावेळी पंकजा मुंडे भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेणार आहेत. दरम्यान यावेळी पंकजा मुंडे समर्थकांची नाराजी पक्षश्रेष्ठींसमोर मांडणार का? हे पहावं लागणार आहे.भाजपाच्या बीड जिल्ह्यातील ११ तालुकाध्यक्षांसह २० पदाधिकाऱ्यांनी शनिवारी राजीनामे दिले. बीड जिल्ह्यातील राजीनाम्याचं लोण अहमदनगर जिल्ह्यामध्येही पोहोचलं असून, पाथर्डी पंचायत समितीच्या सभापती आणि जिल्हा उपाध्यक्ष यांनी राजीनामे देत नाराजी व्यक्त केली आहे.