माघी यात्रेनिमित्त पंढरपुरात येणाऱ्या सर्व पायी येणाऱ्या दिंड्यांनी दिवसा प्रवास करावा असं आवाहन सोलापूर पोलिस प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
पंढरपूरची माघी यात्रा चार दिवसांवर आली आहे. त्यामुळं विठुरायाच्या भेटीसाठी राज्याच्या विविध भागातून पायी सध्या पंढरीची वाट चालत आहेत. मात्र, या सर्व पायी येणाऱ्या दिंड्यांनी दिवसा प्रवास करावा असं आवाहन सोलापूर पोलिस प्रशासनाच्यावतीनं करण्यात आलं आहे. अपघात टाळण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवली. वाढतं अपघातांचं प्रमाण लक्षात घेता पोलिस प्रशासन सतर्क झालं आहे.
माघी वारीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या विविध भागातून पायी दिंड्या पंढरीत दाखल होत आहे. काही दिंड्या वाट चालत आहेत. अशातच दिवसेंदिवस पायी दिंड्यात गाड्या घुसून होणाऱ्या अपघातांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळं सोलापूर पोलीस प्रशासनाने पायी चालत येणाऱ्या दिंड्यांसाठी आवाहन केले आहे. सुरक्षेचे नियम पाळत फक्त दिवसाच रस्त्याच्या कडेने प्रवास करण्याचं आवाहन सोलापूर पोलिस प्रशासनानं केलं आहे. माघी एकादशी सोहळा एक फेब्रुवारी रोजी होत आहे. या वारीसाठी मराठवाडा, विदर्भ , कोकणसह राज्यातील काही भागातून पायी दिंड्या निघाल्या आहेत. सध्या सर्वत्र वाहतूक वाढत चालली आहे. अशातच अपघात टाळण्यासाठी वारकऱ्यांनी काळजी घेणे आवश्यक ठरु लागलं आहे. सुरक्षित पायी वारी होण्यासाठी दिवस पायी चालत असताना दिंडीच्या पुढे आणि मागे स्वयंसेवक ठेवावेत असंही पोलिस प्रशासनाने सांगितले आहे. याशिवाय विसाव्याला अथवा भोजनासाठी थांबताना रस्त्याच्या बाजूला विश्रांती घ्यावी असंही आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.
माघी यात्रा काळात श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पंढरपूरात मोठ्या प्रमाणात वारकरी येत असतात. येणाऱ्या भाविकांच्या आरोग्य, स्वछता आणि सुरक्षेला प्राधान्य देवून आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. तसेच सर्व विभागांनी समन्वय ठेवून सोपवलेल्या कामांची जबाबदारी चोखपणे पार पाडावी अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी तथा मंदीर समितेचे कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिल्या आहेत.