मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या श्रीक्षेत्र पंढरपूर कॉरिडॉर संदर्भात पालकमंत्री जयकुमार गोरे अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत प्रकल्पाच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विविध प्रशासकीय आणि तांत्रिक बाबींवर सखोल चर्चा करून भाविकांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि सुव्यवस्थित सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. प्रकल्प निर्धारित वेळेत आणि उच्च दर्जासह पूर्ण व्हावा, यासाठी विभागांमधील समन्वय अधिक बळकट करण्यावर विशेष भर देण्यात आला.यावेळी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, आमदार समाधान आवताडे तसेच पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.






