येस न्युज मराठी नेटवर्क । मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याला आज १२ वर्ष पूर्ण होत असतानाच, पुन्हा एकदा पाकिस्तानचा खोटेपणा समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानातील दहशतवादविरोधी न्यायालयानं हाफिज सईदला दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. खरंतर हाफीज सईद आता तुरुंगात असायला हवा होता. पण तो लाहोरमधल्या जोहर टाऊनमधल्या घरातून दहशतवादी संघटना चालवत आहे. या घडामोडींशी संबंधित असलेल्या सूत्रांच्या हवाल्याने हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.
हाफिज सईद १२ वर्षांपूर्वी मुंबईवर झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्याचा मुख्य मास्टरमाइंड आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात त्याला १० वर्ष सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. त्याआधी हाफिजला जुलै २०१९ मध्ये अटक करण्यात आली. मागच्या आठवडयात आणखी दोन प्रकरणात हाफिजला शिक्षा सुनावण्यात आली.
इम्रान खान सरकारने दहशतवादाला रोखण्याच्या हेतूने हाफिज सईदला अटक आणि शिक्षा केली नाही, तर FATF च्या ब्लॅक लिस्टमधून स्वत:ची सुटका करुन घेणे, हा त्यामागे उद्देश होता. पाकिस्तानची अर्थव्यवस्था आधीच ढासळलेली आहे. FATF मुळे आणखी आर्थिक निर्बंध परवडणारे नाहीत. त्यामुळे जगाला दाखवण्यासाठी पाकिस्तानने हाफिज सईदवर कारवाई केली होती.