नवी दिल्ली : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला लष्करी कारवाईद्वारे चोख प्रत्युत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी हिरवा कंदिल दाखविला. संरक्षणविषयक उच्चस्तरीय बैठकीमध्ये दहशतवाद चिरडून टाकण्यासाठी कधी, कुठे आणि केव्हा लष्करी कारवाई करायची, याचे संपूर्ण स्वातंत्र्य संरक्षण दलांना असेल, असा स्पष्ट व थेट संदेश मोदींनी दिल्याचे समजते.
दहशतवादी हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा सहभाग असल्याचे पुरावे असल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान निवासस्थानी सुमारे दीड तास संरक्षणविषयक उच्चस्तरीय बैठक झाली. बैठकीला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, सैन्यदलप्रमुख अनिल चौहान, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, नौदलप्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी, हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल उपस्थित होते. या वेळी पंतप्रधानांनी दिलेल्या संदेशामुळे पाकिस्तानविरोधात लष्करी कारवाई केली जाण्याचे संकेत मिळाले आहेत.