सोलापूर : तिरुपतीनजीकच्या तिरुचानूर येथील श्री पद्मावतीदेवी मंदिरात सालाबादप्रमाणे नोव्हेंबरमध्ये ब्रह्मोत्सव होणार असून या उत्सवात शुक्रवार दि. 21 नोव्हेंबर रोजी सोलापुरातील पद्मशाली बांधव देवीला माहेरची साडी अर्पण करणार आहेत, अशी माहिती पद्मशाली श्री पद्मावतीदेवी ब्रह्मोत्सवम संस्थेचे संस्थापक जनार्दन कारमपुरी व अध्यक्ष अंबादास बिंगी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
भगवान व्यंकटेश्वर अर्थात बालाजी यांच्या पत्नी श्री पद्मावतीदेवी या पद्मशाली समाजाच्या कन्या आहेत.
तिरुचानूर येथील श्री पद्मावतीदेवी मंदिरात दरवर्षी ब्रह्मोत्सव साजरा केला जातो. या उत्सवात गत 16 वर्षांपासून सोलापूरच्या पद्मशाली बांधवांना पद्मावतीदेवीला माहेरची साडी अर्पण करण्याचा बहुमान मिळत आहे.
यंदा हा उत्सव नोव्हेंबरमध्ये असून 21 नोव्हेंबरला सोलापुरातील पद्मशालीबांधव पद्मावती देवीला माहेरची साडी अर्पण करणार आहेत. याकरिता सोलापुरातील समाज बांधव हे 19 नोव्हेंबरला तिरुपतीला रवाना होणार आहेत. तेलुगुमध्ये माहेरची साडीला पुट्टींटी पट्टूचिरा असे संबोधले जाते.
पद्मशाली श्री पद्मावतीदेवी ब्रह्मोत्सवम संस्थेच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविला जात आहे. यंदाच्या उत्सवात माहेरची साडी अर्पण करण्यासाठी सोलापुरातील पद्मशाली बांधवांसाठी प्रती जोडपी 15 हजार 501 रुपयांचे देणगी शुल्क असून यामध्ये देवीचे महावस्त्र (माहेरची साडी) प्रवास व निवास, भोजन, बालाजी दर्शन आदी व्यवस्था केली जाणार आहे. या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या समाजबांधवांनी अंबादास बिंगी (मो.9922741436), नागेश सरगम (मो.9096562123) व स्वाती चिटकेन (7796556143) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेला संस्थेचे सचिव व्यंकटेश पडाल, खजिनदार नागेश सरगम, सल्लागार रामचंद्र जन्नू, पांडुरंग दिड्डी, दामोदर पासकंटी, व्यंकटेश रच्चा, स्वाती चिटकेन, माधवी अंदे आदी उपस्थित होते.
यंदा सामूहिक देणगीतून 51 हजारांची साडी अर्पण करणार
यंदा पद्मशाली ज्ञाती संस्था, पद्मशाली पद्मावतीदेवी ब्रह्मोत्सवम संस्थेतर्फे पद्मावतीदेवीला 51 हजारांची साडी अर्पण करण्यात येणार आहे. यासंदर्भात समाजबांधवांकडून सामूहिक देणगी घेण्यात येणार आहे. समाजबांधवांना यथाशक्ती देणगी देऊन या उपक्रमात सहभागी होता येणार आहे. 19 नोव्हेंबरला तिरुपतीला जाण्यापूर्वी आठ दिवस अगोदरपासून ही साडी दाजी पेठ येथील वेंकटेश्वर देवस्थान येथे दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. यानिमित्त मंदिरात कुंकुमार्चना करण्यात येईल. या उपक्रमात समाजबांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पद्मावतीदेवी पद्मशाली असल्याचे प्राचीन दाखले
भगवान व्यंकटेश्वर यांच्या पत्नी महालक्ष्मी स्वरूपिणी देवी पद्मावती या स्वतः ‘ मी पद्मशाली ‘ असा गर्भगृहातून आवाज दिल्याचे पुरातन दाखले आहेत. त्यामुळे पुरातन काळापासून पद्मावतीदेवीला साडी चोळी , ओटीभरणा करण्याचा बहुमान पद्मशालीवंशीयांचा कायम आहे. तशी नोंद ताम्रपटात असून तो ताम्रपट आजही तिरुपती देवस्थानाकडे उपलब्ध आहे, हे विशेष.