मुंबई: “शिवसेना आमदार संजय राठोड यांनी पूजा चव्हाण हिच्या आई-वडिलांना ५ कोटी रुपये देऊन त्यांचं तोंड गप्प केलं आहे. त्यामुळे पूजाचे आई-वडील कधीच तोंड उघडणार नाहीत”, असा सनसनाटी आरोप पूजाची चुलत आजी शांता राठोड यांनी केला. पूजाच्या आजीचा हा व्हिडीओ भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी शेअर केला आहे. “पूजाला न्याय मिळावा यासाठी मी पहिल्या दिवसापासून आवाज उठवत आहे. पूजाचे आई-वडील काल मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले. पूजाच्या आई-वडिलांकडून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत आहे. पूजाच्या आई-वडिलांना स्वत:च्या लेकराची किंमत नाही. त्यामुळेच त्यांना पूजाच्या हत्याराविषयी बोलायचे नाही आणि पैशामुळे माझे चुलत आजी नातेही त्यांना दिसत नाही. याप्रकरणात आतापर्यंत बंजारा समाजाची दिशाभूल झाली आहे. आता पूजाचे आई-वडील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही दिशाभूल करत आहेत”, असे शांता राठोड यांनी म्हटले. पूजाचे मृत्यूप्रकरण दडपण्याचा प्रकार होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूजाला न्याय मिळवून द्यावा, ही माझी नम्र विनंती असल्याचे शांता राठोड यांनी सांगितले.