सोलापूर, (प्रतिनिधी):- सोलापूरकरांना गेल्या तीन वर्षापासून मॅरेथॉनच्या माध्यमातून व्यायामाची सवय लावणाऱ्या सोलापूर रनर्स असोसिएशनकडून यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकत्र गर्दी न करता व्हर्च्युअल मॅरेथॉन घेण्यात येणार असून त्याची नोंदणी शुभारंभ पोलीस उपायुक्त बापू बांगर आणि वैशाली कडूकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सोलापूर रनर्स असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
दरवर्षी जानेवारी महिन्याच्या पहिल्या रविवारी भल्या पहाटे आयोजित करण्यात येत असलेल्या सोलापूर रनर्स असोसिएशनच्या सोलापूर मॅरेथॉनला यंदा तीन वर्ष होत आहेत. सोलापूरसह आंतरराष्ट्रीय स्पर्धक या मॅरेथॉनमध्ये मोठ्यासंख्येने सहभागी होत आहेत. अवघ्या तीन वर्षातच सोलापूर मॅरेथॉनने आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून सोलापूरकरांच्या वैभवामध्ये भर घातली. दरवर्षी होणाऱ्या या मॅरेथॉनमुळे सोलापूरकरांमध्ये स्वत:च्या आरेाग्याबाबत जागृती निर्माण झाली आणि असंख्य सोलापूरकरांना व्यायामाची गोडी लागली आहे. त्यावरूनच कोरोना या महामारीत मॅरेथॉन कधी आणि कशी घेणार याबाबत नागरीकांमधून विचारणा होऊ लागली त्यामुळे यंदाच्या या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर रनर्स असोसिएशनच्या वतीने सोलापूर मॅरेथॉन ही व्हर्च्युअल स्वरूपात घेण्याचे ठरले त्यानुसार 5 किमी, 10 किमी, 21 किमी, आणि सोलापूरमध्ये प्रथमच 42 किमी. अशा चार प्रकारामध्ये ही मॅरेथॉन दि. 3 जानेवारी पहाटेच्या 4 वाजलेपासून ते 17 जानेवारी रोजी रात्री 11 वाजेपर्यतच्या कालावधीत घेतली जाणार आहे. धावपटूंनी त्यांच्या सोईनुसार कोठेही पळून त्याचे रेकॉर्ड सोलापूर रनर्स असोसिएशनकडे दि. 18 जानेवारी दुपारी 12 वाजेपर्यत पाठवून द्यायचे आहेत.
सोलापूर रनर्स असोसिएशनच्या या व्हर्च्युअल मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी आवश्यक आहे त्यानुसार नोंदणीचा शुभारंभ पोलीस उपायुक्त बापू बांगर आणि वैशाली कडुकर यांच्या हस्ते करण्यात आले त्यांनी स्वत: यामध्ये नोंदणी करून शुभारंभ केला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले सोलापूर रनर्स असोसिएशनच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणारी सोलापूर मॅरेथॉन ही सोलापूरकरांना आरोग्यदायी असते यामधून सोलापूरकरांचे स्वास्थ सुधारण्यास मदतही होते त्यामुळे सोलापूरकरांनी मोठ्यासंख्येने आपापल्या ठिकाणाहून यंदाच्या या व्हर्च्युअल मॅरेथॉनमध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी केले. डॉक्टरांच्या पुढाकाराने सोलापूरमध्ये मॅरेथॉन आयोजित होते हे सोलापूरकरांच्या दृष्टीने आरोग्यदायीच आहे असे पोलीस उपायुक्त वैशाली कडुकर यांनी सांगितले. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित होत असलेल्या या व्हर्च्युअल मॅरेथॉन मध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येकाने कोरोना पासबून बचाव होईल याची काळजी घेत सहभागी व्हावे असे सोलापूर रनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विनायक देशपांडे यांनी सांगितले. सोलापूर मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी www.solapurmarathon.com या वेबसाईटवर नाव नोंदणी करणे आवश्यक असल्याचे सचिव डॉ. विश्वास बिराजदार यांनी सांगितले. सोलापूरसह महाराष्ट्रातील धावपटूंनी या व्हर्च्युअल सोलापूर मॅरेथॉनमध्ये मोठ्यासंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सोलापूर रनर्स असोसिएशनच्या वतीने करण्यात आले.