सिटू आयोजित वक्तृत्व स्पर्धेत मिताली जखोटिया प्रथम, मलकारसिद्ध द्वितीय तर तृतीय पियूष देडे यांनी पारितोषिक पटकावले.
सोलापूर दिनांक – देशाला दिशा देणारी युवा पिढी घडविण्यासाठी त्यांच्यातील नेतृत्व गुणाला प्रोत्साहन दिले पाहिजे.त्यांच्यातील सभाधारीष्ट्य पणाला व्यासपीठ दिले पाहिजे. त्यांच्या विचारांची अभिव्यक्तिला दाद दिली पाहिजे ही काळाची पाऊले ओळखून सिटूने स्वातंत्र्य दिनाच्या पूरवसंध्येला जागर स्वातंत्र्याचा 2024 ही जिल्हा स्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करून प्रबोधनाच्या नांदीला सुरुवात केली असे गौरवोद्गार ज्येष्ठ पत्रकार डॉ.रवींद्र चिंचोलकर यांनी व्यक्त केले.
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला बुधवार दि.१४ ऑगस्ट रोजी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स सोलापूर जिल्हा कमिटीतर्फे वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत हिराचंद नेमचंद महाविद्यालयाच्या मिताली गोविंद जखोटिया या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक, अक्कलकोट येथील खेडगीज कॉलेजच्या मलकारसिद्ध पांढरेने द्वितीय क्रमांक, ए जी पाटील इंजिनिअरिंग कॉलेजच्या पियुष देडे याने तृतीय क्रमांक पटकावला.. तर अथर्व देशपांडे,श्रेया माशाळ आणि सुजाता बंडगर यांना उत्तेजनार्थ बक्षिसे मिळाली.
डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृहात झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सचे प्रदेश महासचिव ॲड. एम.एच. शेख यांच्या हस्ते करण्यात आले.
वक्तृत्व स्पर्धा समितीचे निमंत्रक इलियास सिद्दिकी यांनी प्रास्ताविक केले. बक्षीस समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार काँ. नरसय्या आडम मास्तर हे होते. विजेत्या स्पर्धकांना कॉ. नरसय्याआडम मास्तर, ॲड. एम एच शेख,नसीमाताई शेख, सुनंदाताई बल्ला, शेवंताताई देशमुख, विल्यम ससाणे,पुष्पा पाटील यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.
प्रथम क्रमांक अकरा हजार रुपये रोख आणि आकर्षक सन्मान चिन्ह द्वितीय क्रमांक सात हजार रुपये रोख आणि सन्मान चिन्ह तृतीय क्रमांक पाच हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह तर तीनही उत्तेजनार्थ स्पर्धकांना प्रत्येकी तीन तीन हजार रुपये रोख आणि सन्मान चिन्ह देण्यात आली. याप्रसंगी माजी नगरसेवक व्यंकटेश कोंगारी, रंगप्पा मरेड्डी,सिटूचे पदाधिकारी आणि इतर मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. रवींद्र चिंचोलकर, डॉ कीर्तीपाल गायकवाड, आणि प्रा.कुमार सोलनकर यांनी काम पाहिले. परीक्षक डॉक्टर रवींद्र चिंचोलकर यांनी यु इ एस वुमेन्स महाविद्यालयाची विद्यार्थिनी सदफ शेख हिने चांगला प्रयत्न केल्याबद्दल आपले मानधन बक्षीसाच्या स्वरूपात देऊन तिचा आत्मविश्वास वाढवला. या स्पर्धेत सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सुमारे २२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला .
मार्क्स आणि भगतसिंग यांच्या संकल्पनेतील समाजव्यवस्था, शैक्षणिक धोरण आणि वाढती बेरोजगारी, स्वातंत्र्योत्तर काळातील गांधीवाद,संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रसार माध्यमांचे राजकारण;लोकशाही पुढील आव्हान,आरक्षणाचा सामाजिक आक्रोश,धर्मनिरपेक्ष भारतातलं वास्तव आणि आंदोलने भारतीय लोकशाहीला नवसंजीवनी देतील का? या विषयांवर वरिष्ठ महाविद्यालयातील सहभागी सर्वच विद्यार्थ्यांनी आपले सडेतोड विचार मांडले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी इलियास सिद्दिकी, आसिफ पठाण, अकील शेख, ॲड.अनिल वासम, किशोर मेहता, दत्ता चव्हाण,अशोक बल्ला, विक्रम कलबुर्गी, मल्लेशम कारमपुरी,नरेश दुगाणे, अमित मंचले, सिद्धाराम उमराणी, दीपक निकंबे, सनी शेट्टी, शाम आडम यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड.अनिल वासम यांनी केलं तर आभार दत्ता चव्हाण यांनी मानले.