सालाबादप्रमाणे श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त याही वर्षी सिद्धेश्वर केसरी सोलापूर 2023 भव्य जंगी कुस्त्यांचे मैदानाचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धा शनिवार दिनांक 11 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी ४ वाजता सिद्धेश्वर आखाडा, किल्ला बगीचा, सोलापूर या ठिकाणी पार पडतील. स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाची कुस्ती पै. महारुद्र काळेल आणि कौतुक ढाफळे यांच्यात रंगणार असून या कुस्तीसाठी रु. १ लाख रोख आणि चांदीची गदा बक्षीस स्वरूपात देण्यात येणार आहे. तर दुसऱ्या क्रमांकाची ५१ हजार रु. बक्षिसाची कुस्ती पै. संग्राम काकडे आणि पै. पृथ्वीराज खडके यांच्यात रंगणार आहे. तिसऱ्या क्रमांकाची ४१ हजार रुपयांचे बक्षीस असणारी कुस्ती पै. रवीराज सरवदे आणि पै. धना गाडे यांच्यात रंगणार आहे. तसेच इतर अनेक लहान-मोठ्या कुस्त्यांचे आयोजन करण्यात आलेले असून गेली दोन वर्षांपासून कोरोनामुळे खंडित झाल्यामुळे निराश कुस्तीप्रेमींसाठी हि एक पर्वणीच आहे.
या स्पर्धेदरम्यान केगाव सोलापूर येथील मल्ल पै. सौरभ मधुकर याने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत 57 किलो वजन गटात (माती विभाग) सुवर्णपदक पटकावल्याबद्दल संयोजन कमिटीतर्फे भव्य सत्कार करण्यात येणार आहे. या कुस्ती सामन्यांसाठी प्रमुख कुस्ती पंच म्हणून प्रा धनराज भुजबळ हे लाभणार असून निवेदक म्हणून अशोक धोत्रे सर लाभले आहेत. या कुस्तीचे आयोजन भगवा आखाडा गवळी तालीम संघ, नवी पेठ सोलापूर यांच्यातर्फे करण्यात आले आहे. तमाम कुस्तीप्रेमींनी कुस्ती मैदानासाठी हजर राहून महाराष्ट्राची शान असलेल्या मैदानी खेळास भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन भगवा आखाडा गवळी तालीम संघाचे वस्ताद पै. अमर दुधाळ यांनी केले आहे