सोलापूर : “सोलर ऑपरेटेड वॉटर स्प्रिंकलर’द्वारे दुर्गम ठिकाणी शेतकऱ्यांची विजेची समस्या सोडविण्याचा प्रयत्न ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केला आहे. या प्रणालीत ओलावा सेन्सरचा वापर करून स्वयंचलित जलप्रवाह नियंत्रणासह सौरऊर्जेवर चालणारा वॉटर पंप वापरला आहे. ही प्रणाली ग्रीड ऊर्जेचा वापर कमी करून विजेची बचत करते आणि पाण्याचा वापर कमी करून पाण्याचीही बचत करते.
देशात सहा लाखांपेक्षा अधिक खेडी असून, त्या ठिकाणचा प्रमुख व्यवसाय म्हणजे शेती आहे. देशात सर्वसाधारणत: 21 दशलक्ष सिंचनपंप आहेत. त्यापैकी नऊ दशलक्ष हे डिझेलवर तर उर्वरित पॉवर ग्रीडवर आहेत. अनेक गावे विजेपासून दूर असल्याने ग्रीड सिस्टीम विकसित करण्यासाठी मोठा खर्च होतो. त्यासाठी सौरऊर्जेचा वापर करून स्प्रिंकलरद्वारे जलसंधारणाचा विकास करणे हा या प्रकल्पाचा मुख्य हेतू आहे. देशात लोडशेडिंगमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. तर दुसरीकडे काही ठिकाणी शेतीसाठी आवश्यकतेपेक्षा जास्त पाण्याचा वापर करावा लागतो. त्यामुळे मातीची सुपिकता कमी होऊन क्षारता वाढते आणि जमिनीची पीक उत्पादनाची क्षमताही घटते. याचा विचार करून ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल शाखेतील ओंकार जळकोटकर, राकेश परदेशी, सौरभ कटारे, संकेत राठोड व रोहित गायकवाड यांनी प्रा. एस. एस. काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प तयार केला.