सोलापूर : माढा तालुक्यातील फूटजवळगाव येथे पाच वर्षांपूर्वी शेतीच्या कारणावरून चंद्रकांत हांडे यास कुऱ्हाडीने डोक्यात घाव घालून खून केल्याप्रकरणी हनुमंत कोळेकर,बायडाबाई कोळेकर, दत्तात्रय हांडे, आदिनाथ हांडे, हरिदास हांडे यांच्यावर भरलेल्या खटल्याची सुनावणी बार्शी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एन.एस. चव्हाण यांच्यासमोर होऊन त्यांनी चौघांची निर्दोष मुक्तता केली, मात्र हनुमंत कोळेकर यास जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
यात हकिकत अशी की, 5/10/2019 रोजी वरील सर्व आरोपींनी शेतीच्या कारणावरून चंद्रकांत हांडे यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून जखमी केले, जखमी अवस्थेत त्यास उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले असता उपचारादरम्यान चंद्रकांत हांडे यांचा मृत्यू झाला, अशा आशयाची फिर्याद मयताचा मुलगा सूर्यकांत हांडे यांनी पोलीस ठाण्यात दिली होती. त्यावरून पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकार पक्षातर्फे एकंदर 14 साक्षीदार तपासण्यात आले.
खटल्याच्या सुनावणीच्या वेळेस आरोपीचे वकील ॲड मिलिंद थोबडे यांनी आपले युक्तीवादात हॉटेल त्रिमूर्ती येथे आरोपींनी चंद्रकांत याच्या खुनाचा कट रचला, त्याबाबतचा हॉटेल त्रिमूर्ती अस्तित्वात असल्याचा पुरावा सरकार पक्षाकडून शाबीत झाला नसल्याचा युक्तिवाद मांडला, त्यावरून न्यायाधीशांनी चार आरोपींची निर्दोष मुक्तता केली, मात्र आरोपी हनुमंत कोळेकर यास जन्मठेप व 10,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. यात आरोपी तर्फे ॲड.मिलिंद थोबडे, ॲड. सागर रोडे ,ॲड.निखील पाटील,यांनी तर शिक्षा झालेल्या आरोपीतर्फे ॲड.प्रशांत एडके तर सरकारतर्फे ॲड.राजश्री कदम यांनी काम पाहिले.