शिक्षणाधिकारी जगतापांनी साधला शिक्षकांशी संवाद
सोलापूर : शिक्षण विभागाकडून येथील दाते मंगल कार्यालयात शिक्षक संवाद उपक्रमाचे आयोजन केले होते. त्यामध्ये मुख्याध्यापक, लिपिक व शिक्षकांसाठी कार्यशाळा घेण्यात आली.
या कार्यक्रमास शिक्षणाधिकारी सचिन जगताप, पंढरपूरचे गटशिक्षणाधिकारी मारुती लिगाडे, विवेकवर्धिनी विद्यालयाचे प्रा. डॉ. यु. आर. मुंढे, सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक स्मिता नडीमेटला, वरिष्ठ सहाय्यक अनिल पाटील, श्रीकांत धोत्रे, गुरुदाप्पा रेवे, अतिरिक्त मुख्य लिपिक राजगुरू उपस्थित होते. या बैठकीस जिल्ह्यातील मुख्याध्यापक, लिपिक आणि शिक्षक उपस्थित होते. कार्यशाळेत ५६ शिक्षकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याचे निवारण करण्यात आले. यावेळी माध्यमांशी बोलताना शिक्षणाधिकारी जगताप यांनी सांगितले की, सोलापूर जिल्ह्यात १ हजार ८५ माध्यमिक शाळा असून साडेतीन लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची संख्या आहे. यासाठी ७ हजार ५०० शिक्षक काम करत आहेत. शिक्षक, पालक आणि शाळांची कामे प्रलंबित राहू नयेत.

यासाठी तालुकास्तरावर शिक्षक संवाद उपक्रमाद्वारे जागेवरच तक्रारींचा निपटारा केला जाणार आहे. याचबरोबर एक कोटी वृक्ष लागवडीत सहभाग नोंदवून वृक्षारोपण कार्यक्रम तसेच घरघर संविधान, डिजिटल शाळा या विविध उपक्रमाची माहिती मुख्याध्यापक शिक्षक आणि लिपिकांना देण्यात आली. पुढील काळात शाळेतील शिक्षकांच्या तक्रारीचे तात्काळ निराकरण करण्यासाठी शिक्षक संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना मोबाईल मधून बाहेर काढणे गरजेचे असून मुलांना सुजाण नागरिक बनवण्यासाठी शाळांनी उपक्रमशील कार्यक्रमाचे आयोजन करावे. अशा सूचना देण्यात आल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.