नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी कोरोनाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. रोज काही ना काही ट्विट करून त्यांनी मोदी सरकार विरोधात एक प्रकारचे ट्विटर वॉरच सुरू केलं आहे. आजही त्यांनी नवं ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे.
राहुल गांधी यांनी आज मोदींवर अत्यंत खोचक ट्विट केलं आहे. ‘एक तर महामारी, त्यात पंतप्रधान अहंकारी’, असं ट्विट राहुल यांनी केलं आहे. राहुल यांच्या टीकेमागे संदर्भ आहे. तो म्हणजे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांच्या विधानाचा. केंद्र सरकारने लसींचा पुरेसा स्टॉक नसल्याचं माहीत असतानाच लसीकरण मोहीम सुरू केली. शिवाय 45 आणि नंतर 18 वर्षांवरील व्यक्तिंनाही लस देण्याची घोषणा केली. केंद्राकडे कोणतंही नियोजन नव्हतं. जागतिक आरोग्य संघटनेच्या गाईडलाईनकडे दुर्लक्ष करण्यात आलं, असं जाधव यांनी म्हटलं होतं. जाधव यांच्या या वक्तव्याची बातमीही राहुल यांनी ट्विटमध्ये शेअर केली आहे.