सांगली ( सुधीर गोखले) – मन कि बात मधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या सन्मानार्थ ‘मेरी मिट्टी मेरा देश’ या अभियानाची सुरुवात केली होती जिल्ह्यातील मिरज तहसीलदार डॉ अपर्णा मोरे यांनीही आज क्रांती दिनाचे औचित्य साधन या उपक्रमाची सुरुवात महापालिका क्षेत्राबरोबरच मिरज तालुक्याच्या ६४ गावांमधून होणार असल्याचे जाहीर केले आहे.
स्वातंत्र्य सैनिक, वीर जवान, माजी सैनिक याना वंदन करणारा ‘मेरी मिट्टी मेरा देश’ हे अभियान आजपासून मिरजेसह संपूर्ण संपूर्ण तालुक्यात आणि मनपा क्षेत्रामध्ये प्रभावी पणे राबवले जाईल. त्या म्हणाल्या कि,’हा उपक्रम संपूर्ण देशात राज्यात आणि प्रत्येक गावात एकाच वेळी होणार आहे. या उपक्रमांतर्गत शिला फलक आपल्या धरणीमातेचे वसुधा वंदन, स्वातंत्र्य सैनिक, वीरांना वंदन, पंचप्रण (शपथ), ध्वजारोहण आणि राष्ट्रगीताचे गायन अशा पंचसूत्री द्वारे आपण हा उपक्रम मिरज तालुक्यात राबवणार आहोत.’ हा उपक्रम पाच भागाद्वारे राबवण्यात येईल.
प्रथम भागात महापालिका, नगरपंचायत, शाळा तसेच महाविद्यालयांमध्ये शिला फलक उभारणी केली जाईल. दुसऱ्या भागात शहरातील योग्य विस्तीर्ण ठिकाणी ७५ देशी वृक्ष रोपांची लागवड करून एक अमृत वाटिका तयार केली जाईल आणि त्याद्वारे आपल्या वसुधेला वंदन केले जाईल. तिसऱ्या विभागामध्ये आपल्या थोर स्वातंत्र्य सैनिकांचा वीरांचा पोलीस दलाचा सेवा वीरपत्नींचा निवृत्त सैनिकांचा यथोचित सन्मान केला जाईल. चौथ्या विभागामध्ये स्थानिक नागरी स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी, सर्व अधिकारी कर्मचारी आणि सर्व नागरिक शपथ घेतील. आणि पाचव्या विभागात ध्वजारोहण आणि राष्ट्रगीत गायन होईल हा उपक्रम प्रभावीपणे राबवण्याच्या दृष्टीने तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती मध्ये विशेष ग्रामसभा होणार आहे असेही त्यांनी सांगितले.