येस न्युज मराठी नेटवर्क : टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुरुवातीपासून अप्रतिम कामगिरी करणाऱ्या भारताच्या महिला बॉक्सर लवलीना बोर्गोहेनने सेमीफायनलपर्यंत धडक मारली होती. या सोबतच तिने किमान कांस्य पदक पक्क केलं होत. मात्र आज सेमीफायलच्या सामन्यात वर्ल्ड चॅम्पियन टर्कीची बॉक्सर सुरमेनेलीला नमवून आपल्या पदकाचा रंग बदल्याण्याची संधी लवलीनाकडे होती. पण अटीतटीच्या सामन्यात सुरमेनेलीने लवलीनाला 5-0 ने नमवत पुढची फेरी गाठली.
भारताला ऑलिम्पिक खेळात पदक मिळवून देणारी लवलीना तिसरी बॉक्सर असून दुसरी महिला बॉक्सर आहे. याआधी 2008 मध्ये बीजिंग ओलिम्पिकमध्ये विजेंदर सिंहने कांस्य पदक जिंकलं होतं. तर 2012 लंडन ओलिम्पिकमध्ये मेरी कोमने कांस्य पदकावर नाव कोरलं होतं. विशेष म्हणजे लवलीनाने पहिल्यांदाच ऑलिम्पिक खेळताना पदक खिशात घातलं आहे.