अमरावती : चोरीच्या दाखल गुन्ह्यात अटक न करण्यासाठी आणि अटक केली तर लवकर जामीन मिळण्यासाठी मदत करण्याच्या मोबदल्यात पाच हजार रुपये लाच मागणाऱ्या सहायक पोलीस उपनिरिक्षकासह (A.S.I.) हवालदाराला अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक करण्यात आली.याप्रकरणी दोघांविरुद्ध भातकुली पोलीस ठाण्यात ए.सी.बी.ने गुन्हा दाखल केला आहे.
सहायक पोलीस उपनिरीक्षक गजानन प्रल्हादराव खुरकटे (वय-५६) व हवालदार मोहम्मद इस्माईल शेख उमर (वय-५२) असे गुन्हा दाखल करुन अटक केलेल्या लाचखोर पोलिसांची नावे आहेत.तक्रारदार यांच्यावर भातकुली पोलीस ठाण्यात शेतातील पाण्याची मोटर चोरीचा गुन्हा दाखल आहे.
या गुन्ह्यात त्याला अटक न करण्याकरता, अटक केली तर लवकर जामीन मिळावा यासाठी मदत करण्यासाठी खुरकटे व मोहम्मद इस्माईल यांनी लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी अमरावती ए.सी.बी.कडे लेखी तक्रार केली.
अमरावती ए.सी.बी. युनिटने पडताळणी केली असता तक्रारदार यांच्याकडे खुरकटे व मोहम्मद इस्माईल यांनी पाच हजार रुपये लाच मागून ती स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. ३ ऑक्टोबर रोजी सापळा कारवाई दरम्यान खुरकटे व मोहम्मद इस्माईल यांना संशय आल्याने त्यांनी लाचेची रक्कम स्वीकारली नाही. परंतु लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने दोघांना अटक केली.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड , अप्पर पोलीस अधीक्षक अरुण सावंत व देविदास घेवारे,
पोलीस उपअधीक्षक संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष इंगळे व सतीश उमरे, पोलीस अंमलदार विनोद कुंजाम, निलेश महिंगे, युवराज राठोड, रोशन खंदारे, चालक सतीश कीटकुले, प्रदीप बारबुद्धे यांच्या पथकाने केली.