बालासोर : ओडिशातील बालासोरमध्ये रेल्वे अपघातामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. काहींनी वडील गमावले तर काहींनी मुलगा, कुणी आई तर कुणी बहीण. अपघातानंतर रुग्णालयांमध्ये नातेवाईकांनी शोध घेण्यासाठी गर्दी केलीय. एका व्यक्तीने त्याच्या भाच्याचा मृतदेह ओळखला. दरम्यान, त्याच मृतदेहावर आता आणखी पाच जणांनी दावा केला आहे. नातेवाईकांना शोधण्यासाठी आता डीएनएचा आधार घेतला जात आहे. रेल्वे दुर्घटनेत २८८ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी २०५ मृतदेहांची ओळख पटली असून इतरांची ओळख पटणे बाकी आहे. या दुर्घटनेत एक हजारहून अधिक जण जखमी झाले आहेत.
मोहम्मद इनाम उल हक यांनी सांगितलं की, माझ्या भाच्यासह माझ्या भावाचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला होता. त्यांचे मृतेदह घेण्यासाठी आम्ही आलो आहे. आम्ही गेल्या चार दिवसांपासून इथे फिरतोय. माझा भाऊ आणि दोन भाचे ट्रेनमधून प्रवास करत होते. त्यांचा मृत्यू झाला आहे. आम्हाला आज एम्समध्ये एका भाच्याचा मृतदेह आढळून आला. आता मी भावाचा आणि दुसऱ्या भाच्याचा शोध घेत आहे.