300 कलाकार करणार ईशान्येकडील कलांचे सादरीकरण.आज उद्घाटन
सोलापूर – संस्कृती मंत्रालय, भारत सरकार, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर,आणि महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य विभाग मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापुरात येत्या २६ते २८ मार्च या कालावधीत ” ऑक्टेव २५ ” या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभीषण चवरे आणि दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राच्या संचालक आस्था कार्लेकर यांनी ही माहिती दिली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन २६ मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजता मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. माहिती व तंत्रज्ञान व सांस्कृतिक विभागाचे कार्यमंत्री आशिष शेलार आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, धाराशिवचे खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर ,सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे, माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते - पाटील यांच्यासह आमदार रणजितसिंह मोहिते पाटील ,सुभाष देशमुख, नारायण पाटील, उत्तमराव जानकर, अरुण लाड, दिलीप सोपल, समाधान आवताडे, राजू खरे, जयंत आसगांवकर, विजय देशमुख ,सचिन कल्याणशेट्टी ,अभिजीत पाटील ,बाबासाहेब देशमुख, आणि आमदार देवेंद्र कोठे आदी मान्यवर यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे
ईशान्य भारतातील ३०० कलाकारांचा समावेश असलेला ” ऑक्टेव २५ ” हा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम सोलापुरातील हरीभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर तीन दिवस दररोज सायंकाळी ६.३०ते रात्री ९.३० या वेळेत होणार आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम सोलापूर येथे होत आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून ईशान्य भारतातील संस्कृती, हस्तकला,खाद्यसंस्कृती तसेच लोककला यांचा सोलापूरकरांना अनुभव घेता येणार आहे. तीन दिवस चालणारा हा कार्यक्रम विनामूल्य असून याचा लाभ घ्यावा ,असे आवाहन राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे, दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र संचालिका आस्था कार्लेकर, सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई चे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच हस्तकला प्रदर्शन ,विक्री तसेच स्वादिष्ट पदार्थांचे विक्री स्टॉल्सही असणार आहेत त्यामळे ईशान्येकडील खाद्यपदार्थांचा आस्वादही सोलापूरकरांना घेता येणार आहे. सोलापुरात हा कार्यक्रम प्रथमच होत असून सोलापुरातील कलाक्षेत्रातही या कार्यक्रमाची उत्सुकता राहिली आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक मंत्रालय तसेच कार्य विभागाचे प्रतिनिधी विशेष परिश्रम घेत आहेत.
या कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनासाठी सोलापुरातील नाट्यकर्मी आणि कलाकार यांचे सहकार्य लाभत आहे. या कार्यक्रमाच्या प्रचार प्रसिद्धीसाठी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी होर्डिंग बॅनर लावण्यात आलेले आहेत. कार्यक्रमाच्या सन्मानिका विविध ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत.