येस न्युज नेटवर्क : देशभरात महागाई मोठ्या प्रमाणत वाढत चालली आहे. इंधनाच्या किंमती वाढत असून, देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी शंभरी गाठली आहे. अशातच आज घरगुती गॅसच्या किमतीतही ५० रुपयांनी वाढ झाली. या दररोजच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय. याच महागाईच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ‘पंतप्रधानांना युक्रेन युद्धाची चिंता, देशातील महागाईची नाही’, असा टोला राऊतांनी हाणला असून, त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेतेमंडळीवरही टीका केली आहे.
“महागाईच्या मुद्द्यावर कोणीच बोलायला तयार नाही. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी युरोप दौऱ्यावर जाऊन आले. पंतप्रधानांना रशिया-युक्रेन युद्धाची सर्वाधिक काळजी आहे. त्यासंदर्भात ते मध्यस्त करताहेत आणि त्यांचे भक्त त्यासंदर्भात व्हावा करातहेत. पण या देशातली जनता महागाईशी युद्ध करतेय.”, अशी टीका संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केली.