सोलापूर : परिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारी (दि. १७) सोलापुरात कामबंद आंदोलन करण्यात येणार असून, शुक्रवारपासून (दि. १८) बेमुदत आंदोलनाची पूर्वसूचना देण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या राज्य अध्यक्षा मनीषा शिंदे यांनी माहिती दिली


दरम्यान, वेतन त्रुटी निवारण करावे, परिचर्या संवर्गातील शुश्रूषा, शैक्षणिक व अशैक्षणिक विविध पदांच्या कायमस्वरूपी १०० टक्के पदभरती, पदनिर्मिती व पदोन्नती करण्यात याव्यात, अतिरिक्त खाटांसाठी मनुष्यबळ पुरवा, सेवाप्रवेश नियम तात्काळ मंजूर करून प्राचार्य, उपप्राचार्य, पाठ्यनिर्देशिका आदी पदांची विद्यार्थिसंख्येच्या तुलनेत भारतीय परिचर्या परिषदेच्या मानकांप्रमाणे सर्व पदांच्या पदनिर्मिती कराव्यात व कायमस्वरूपी पदे भरण्यात यावीत, केंद्र शासनाप्रमाणे परिचारिकांना भत्ते देण्यात यावे, शैक्षणिक वेतनवाढी, पदनामात बदल करावा आदी विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत राज्य कामगार विमा योजना रुग्णालयात आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्यात येणार असल्याचेही राज्य अध्यक्षा मनीषा शिंदे यांनी सांगितले.