सोलापूर : कुंभारी येथे सोलापूर शहरातील ३० हजार असंघटीत कामगारांचा एकात्मिक महत्वाकांक्षी पथदर्शी रे नगर गृहनिर्माण प्रकल्प साकारत आहे. या गृहनिर्माण प्रकल्पाचा हस्तांतरण सोहळा नियोजित १२ जानेवारी २०२४ रोजी होणार असून त्या अनुषंगाने या वसाहतीत वास्तव्यास येणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना नियमितपणे स्वच्छ व स्वस्त पिण्यासाठी मुबलक पाणी तसेच अन्य जीवनावश्यक घटकांसाठी वापरण्यासाठी पाणी हे अत्यंत अत्यावश्यक आहे. याकरिता महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग लाभक्षेत्र विकास प्राधिकरण यांच्याशी सिंचन भवन येथे आज २ जानेवारी २०२४ रोजी बिगर सिंचन पाणी वापर करार झालेला आहे.
या करारामुळे रे नगर वसाहतीला दररोज २४ एमएलडी पाणी एनटीपीसी कडून मिळणार आहे. या मिळालेल्या पाण्यातून वापर झालेल्या पाण्याचे जलशुद्धीकरण करून १६ एमएलडी पाणी एनटीपीसी ला परत पुरवठा करावयाचे आहे. हा करार अभूतपूर्व व ऐतिहासिक करार असून या करारान्वये लाभार्थ्यांना २४ तास पाणी उपलब्ध होणार आहे. याकरिता शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला असून शासनानेही याची दखल घेऊन लाभार्थ्यांकारिता सहकार्याची भूमिका निभावलेली आहे. केंद्र व राज्य सरकारचे विशेष आभार लाभार्थ्यांच्या वतीने, रे नगर फेडरेशनच्या वतीने प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी सिंचन भवन, सोलापूर येथे व्यक्त केले.
मंगळवार दि. २ जानेवारी २०२४ रोजी महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अधीक्षक अभियंता धीरज साळे व रे नगर फेडरेशन यांचा सिंचन भवन सोलापूर येथे लाभार्थ्यांना पिण्यासाठी व वापरासाठी मुबलक पाणी वितरणाचा अधिकृत अभूतपूर्व करार झाला. यावेळी रे नगर फेडरेशनचे मुख्यप्रवर्तक, माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर), चेअरमन कॉ. नलिनीताई कलबुर्गी व सेक्रेटरी कॉ. युसुफ शेख (मेजर) यांनी कराराच्या दस्तावेजावर स्वाक्षरी केले व मा. कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यांनी साक्षांकित केले.
पंतप्रधान आवास योजना अंतर्गत कुंभारी येथे ३० हजार असंघटीत कामगारांचा महत्वाकांक्षी पथदर्शी गृहनिर्माण प्रकल्प उभारले असून त्याचे पहिल्या टप्प्यातील १५ हजार घरे नियोजित १२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान मा. नरेद्रजी मोदी यांच्या हस्ते हस्तांतरण सोहळा संपन्न होणार आहे.या प्रसंगी माजी नगरसेविका कामिनी आडम, शाखा अभियंता योगेश मोरे, वसंत विहार प्रा.लि. चे मेहुल मुळे, संदीप झाकणे, कुर्मय्या म्हेत्रे, गजेंद्र दंडी, ॲड.अनिल वासम ,विल्यम ससाणे, वसीम मुल्ला, वीरेंद पद्मा, नरेश दुगाणे, बाळकृष्ण मल्याळ, शाम आडम आदींची उपस्थिती होती.