सोलापूर, दि.5- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे यांना लोकसेवा वसुंधरा गौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे. पुण्यातील लोकसेवा प्रतिष्ठान, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, हरित मित्र परिवार आणि दूरदर्शन केंद्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
पुण्यातील एका समारंभात हा पुरस्कार डॉ. राजेंद्र वडजे यांनी स्वीकारला. विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी याबद्दल अभिनंदन करीत डॉ. वडजे यांचा सन्मान केला. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे, कुलसचिव योगिनी घारे, राष्ट्रीय सेवा योजना विभागातील कर्मचारी ज्ञानेश्वर भोई आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रभारी कुलगुरू डॉ. कामत म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून मागील अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण झाले आहे. त्यामुळे आज विद्यापीठ कॅम्पस हिरवाईने नटलेला दिसून येतो. सुंदर वातावरण येथे आहे. वृक्ष संवर्धन झाल्यामुळेच डॉ. वडजे यांना हा पुरस्कार प्राप्त झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.