महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात एकही महिला मंत्री नसणं हे थोडसं कमीपणाचं वाटत असल्याचे वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं.
एवढ्या मोठ्या महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात एकही महिला मंत्री नसणं हे थोडसं कमीपणाचं वाटत असल्याचे वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं. महाराष्ट्र सरकारला ते शोभत नाही. नेमकी काय अडचण आहे? हे कळायला मार्ग नाही. ही गोष्ट आम्हालाही आणि महिला वर्गाला योग्य वाटत नसल्याचे पवार म्हणाले.
आज विरोधक सत्ताधारी आमने-सामने येणार
आजपासून विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु होत आहे. सोमवार आणि मंगळवार अधिवेशनाचे कामकाज बंद होते. आजही विविध मुद्यावरुन विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने येण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसाचा शेती पिकांना बसलेला फटका, शेतमालाला हमी भाव यासह इतर मुद्यांवरुन विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. आज अजित पवार यांनी सभागृहात जाण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधलाय यावेळी त्यांनी जागतिक महिला दिनाच्या महिलांना शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी राज्याच्या मंत्रीमंडळात एकही महिला मंत्री नसल्याची खंत अजित पवार यांनी व्यक्त केली.
अवकाळी पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान, सरकारनं मदत करावी
हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणं राज्यात अनेक भागात अवकाळी पाऊस झाला आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. हरभरा, गहू, मका, ज्वारी, द्राक्ष, भाजीपाला, कांदा या पिकांचं मोठं नुकसान झाल्याचे अजित पवार म्हणाले. त्यामुळं आज आम्ही विरोधी पक्षांच्या वतीन शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे अशी मागणी करणार असल्याचे अजित पवार म्हणाले. सरकारला अजूनही अंदाज आलेला दिसत नाही. धूलिवंदन होळी असल्यामुळं बरेच मान्यवर नेते त्यामध्ये गुंतलेले होते. महाराष्ट्राच्या दृष्टीनं महत्त्वाचा सण आहे. त्याचा आनंद सुटला पाहिजे. पण त्याचवेळी महाराष्ट्रातील बळीराजा चिंतातूर झाला आहे. शेतकरी खचून गेला आहे. त्याला उभारी देण्याचं काम राज्य सरकारनं करावं असे अजित पवार म्हणाले. विशेषत रब्बी पिकांचं मोठ नुकसान झालं आहे. जिथं शेतकऱ्यांचं जास्त नुकसान झालं आहे, तिथं नियमांच्या बाहेर जाऊन मदत करावी असे अजित पवार म्हणाले.
आज महाराष्ट्राचे आर्थिक धोरण जाहीर होणार
दरम्यान, आज महाराष्ट्राचे आर्थिक धोरण सभागृहामध्ये जाहीर केलं जाणार आहे. त्यामुळं राज्याची आर्थिक परिस्थिती काय आहे यावरुन स्पष्ट होईल. राज्याच्या अर्थसंकल्प उद्या (9 मार्च) सादर केला जाणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या अर्थसंकल्प सादर करणार आहेत.