औरंगाबाद : सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ‘राज’ सभेचे शहर पोलिसांनी संपूर्ण पोर्स्टमार्टेम केलं आहे. पोलीसांनी घालून दिलेल्या अटींचा भंग झाल्याचे समोर आले असून अखेर राज ठाकरे यांच्यासह ज्यांच्या नावाने परवानगी घेण्यात आली होती त्या मनविसेचे जिल्हाध्यक्ष राजीव जेवळीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर पोलीस दलाचे जनसंपर्क अधिकारी पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी सांगितले की, पोलीस उप निरीक्षक गजानान इंगळे यांनी फिर्याद दिली. त्यावरून कलम ११६, ११७, १५३ भादंवि १९७३ सहकलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ सुधारीत ३१ जुलै २०१७ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींमध्ये राज ठाकरे व राजीव जेवळीकर व इतर आयोजक यांचा समावेश असून अधिक तपास पोलीस निरीक्षक अशोक गिरी करीत आहेत.