टँकर लागणाऱ्या गावांची संयुक्त पाहणी तहसिलदार, गट विकास अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता व भूजल यंत्रणेचे अधिकारी यांनी करून 15 दिवसात अहवाल द्यावा
जिल्ह्यात चारा निर्मितीसाठी पशुसंवर्धन विभागाला बियाणे खरेदीसाठी 2 कोटीचा निधी देण्यात येणार
सोलापूर, दिनांक 30( जिमाका):- जिल्ह्यात टंचाईची परिस्थिती आहे. माहे जानेवारी 2024 पासून टँकर सुरू करण्याच्या मागणीत वाढ होऊ शकते. त्या अनुषंगाने प्रत्येक तालुक्यातील तहसिलदार, गट विकास अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता व भूजल यंत्रणेचे अधिकारी यांनी माहे जानेवारी ते जून 2024 पर्यंत टँकर लागणाऱ्या गावांची संयुक्त पाहणी प्रत्यक्ष जागेवर जाऊन करावी व तसा अहवाल पुढील पंधरा दिवसात सादर करावा. तसेच टंचाईच्या उपाययोजना राबविण्यात कोणीही हलगर्जीपणा करू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधिन शेळकंदे, उपजिल्हाधिकारी महसूल विठ्ठल उदमले, उपजिल्हाधिकारी रोहयो चारुशीला देशमुख, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता पी. व्ही. पाटील, कृषी उपसंचालक राजकुमार मोरे, जिल्हा जलसंधारण अधिकारी दामा, शिक्षणाधिकारी प्रा. प्रसाद मिरकले, जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका वीणा पवार, उपविभागीय अधिकारी अमित माळी, गजानन गुरव, तहसिलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी तसेच संबधित अन्य विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, जिल्ह्यात कोणत्या गावात पाण्याच्या टँकरची आवश्यकता आहे. याची संबंधित तालुक्यातील तहसीलदार, गटविकास अधिकारी, पाणीपुरवठा विभागाच्या उपाभियंता तसेच भूजल विभागाचे अधिकारी यांनी दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घेऊन पाहणी करावी. गावाची व टँकरसाठी आवश्यक असलेल्या पाणी स्त्रोताची पाहणी करताना संबंधित गावातील ग्रामसेवक व तलाठी यांनाही सोबत घ्यावे. त्यानंतर अभ्यासपूर्ण अहवाल सादर करावा. सर्व उपविभागीय अधिकारी यांनी प्रत्येक तालुक्यात सर्व संबंधित शासकीय यंत्रणाची दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येणाऱ्या उपाय योजनाबाबत स्वतंत्र बैठका घेऊन संबंधितांना मार्गदर्शन करावे. प्रत्येक शासकीय यंत्रणांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करावे. या कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
दुष्काळी परिस्थितीत बँकांनी शेतीशी निगडित असलेल्या कोणत्याही प्रकारच्या कर्जाची वसुली करू नये याबाबत जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकाने सर्व संबंधित बँकांना कळवावे. शेतीशी संबंधित कर्ज वसुलीबाबत तक्रारी आल्यास संबंधित बँकांना तहसीलदारांनी नोटीसा द्याव्यात. तसेच दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यात अवैध पाणी उपसा बाबत वीज वितरण कंपनीने केलेल्या कार्यवाहीची माहिती दर आठवड्याला सादर करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिले. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत सर्व शासकीय यंत्रणांनी 13 हजार कामे सेल्फ वर ठेवलेली असून त्यात मोठ्या प्रमाणात वाढ करावी, असेही त्यांनी सुचित केले.
पशुसंवर्धन विभागाने पुढील दोन महिने पुरेल एवढा चारा जिल्ह्यात उपलब्ध असल्याची माहिती दिली आहे. तरी पशुसंवर्धन विभागाने जिल्ह्यातील पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांचा शोध घ्यावा व त्यांना चारा निर्माण करण्यासाठी बियाणे उपलब्ध करून द्यावे. बियाण्यासाठी नियोजन समिती मधून 2 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली. तसेच पशुसंवर्धन विभागाने कृषी विभागाशीही संपर्क करून उसाच्या वाड्याचा चारा उपलब्ध झाल्यास व शेतकऱ्यांनी चारा निर्माण केल्यास जिल्ह्यात चारा टंचाईची परिस्थिती निर्माण होऊ नये नाही यासाठी प्रयत्न करावेत व तसा अहवाल सादर करावा, असे निर्देशही त्यांनी दिले.
जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्प्यातील झालेल्या कामांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव जलसंधारण विभागाने त्वरित सादर करावेत. पंढरपूर व माळशिरस तालुक्याने अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांचे व गाळमुक्त धरण गाळमुक गाळयुक्त शिवारअंतर्गत कामांचे प्रस्तावही सादर करावेत. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वीज वितरण कंपनीने वीज सवलत द्यावी, शिक्षण विभागाने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची फी माफी सवलत लागू करावी, विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजन देण्यात यावे, प्रत्येक विभागाने दुष्काळी परिस्थितीची जाणीव ठेवून अत्यंत सकारात्मकपणे व गतिमान पद्धतीने कामे करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिल्या.
जिल्हा परिषदेच्या सर्व यंत्रणांनी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन विहीर पुनर्भरण, रोजगार हमी योजनेचे सेल्फ वरील कामे, अटल भूजल योजना, पाणीपुरवठ्याच्या योजनांची कामे त्वरित मार्गी लागतील यासाठी प्रयत्न करावेत. सर्व गटविकास अधिकारी व पाणीपुरवठ्याचे अभियंता यांनी तहसीलदार यांच्या समवेत टँकर सुरू करण्याच्या अनुषंगाने स्थळ पाणी करून अहवाल सादर करावा. या परिस्थितीत अत्यंत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सर्व संबंधित यंत्रणांनी काम करणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील माढा, करमाळा, बार्शी, सांगोला व माळशिरस या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे. तर 10 नोव्हेंबर 2023 नुसार सोलापूर जिल्ह्यातील तालुक्यामधील मंडळ निहाय दुष्काळ (45) जाहीर झालेला आहे. दुष्काळ झालेल्या सर्व गावांमध्ये जमीन महसूल सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुली स्थगिती, कृषी पंपाच्या चालू विज बिल 33.5टक्के सूट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, भोजन योजना आदी सवलती लागू करण्यात आल्याची माहिती महसूल उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले यांनी दिली.