येस न्युज मराठी नेटवर्क : भाजपचे नेते, आमदार नितेश राणे यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यांना मध्यरात्रीपासून उलट्यांचा त्रास सुरू झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात येत आहेत. नितेश राणे यांनी यापूर्वी छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती. तसेच त्यांचा रक्तदाबही वाढला होता. मात्र, सिंधुदुर्गातील ओरोस येथील रुग्णालयात हृदयरोग तज्ज्ञ नसल्याने त्यांना तातडीने ओरोस येथून कोल्हापुरातील रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांना मध्यरात्रीपासून उलट्यांचा त्रास सुरू झाला. रात्रभरात त्यांनी तीन वेळी उलट्या केल्याने त्यांच्यावर तातडीने उपचार केले जात आहेत. नितेश यांना उलट्यांचा त्रास नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालं नाही. अशक्तपणामुळेही त्यांना उलट्यांचा त्रास सुरू झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नितेश राणे यांना सोमवारी ओरोसवरून कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात आणण्यात आले होते. या रुग्णालयातील हृदयरोग विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांचं एक पथक नेमण्यात आलं आहे. काल त्यांच्या काही टेस्ट करण्यात येणार होत्या. परंतु, त्या झाल्या नाहीत. आज या वैद्यकीय टेस्ट होणार होत्या. मात्र, त्यांनी रात्रभरात तीन वेळा उलट्या केल्याने त्यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे त्यांच्या आज होणाऱ्या इतर वैद्यकीय चाचण्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. वैद्यकीय पथक त्यांना तपासून उपचाराबाबतचा पुढील निर्णय घेणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. नितेश यांना रक्तदाब, छातीत दुखणे आणि मानदुखीचाही त्रास होत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.