विरोधकांनीही विधीमंडळाच्या पायऱ्यांवर राज्य सरकारच्या विरोधात निरमा आंदोलन केलं. नेत्यांच्या फोटोला निरम्याने आंघोळ घालत घोषणाबाजी देण्यात आली.
विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे शेवटचे दोन दिवस बाकी आहेत. आजच्या दिवशी विविध मुद्यांवरुन विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. सत्ताधारी पक्षानं काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केलं. तसेच त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तर दुसरीकडे विरोधक देखील शेतकरी प्रश्नासह विविध मुद्यावरुन आक्रमक झाले आहे. विरोधकांनीही विधीमंडळाच्या पायऱ्यांवर राज्य सरकारच्या विरोधात निरमा आंदोलन केलं. नेत्यांच्या फोटोला निरम्याने आंघोळ घालत घोषणाबाजी देण्यात आली.
विरोधकांचा सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न
राज्यातील अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांना अजूनही न मिळालेली मदत, पंचनामे, गुढीपाडवा उलटून गेला तरी आनंदाचा शिधा अजूनही राज्यातील अनेक ठिकाणी न मिळाल्यामुळे विरोधक सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. गुजरात निरमा पावडर, केंद्रीय यंत्रणा तसेच राज्य सरकारच्या कारभाराविरोधात विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलन केलं. विधीमंडळाच्या पायऱ्यावर विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. पन्नास खोके एकदम ओके अशी घोषणाबाजी देखील विरोधकांनी यावेळी केली.
भाजपमध्ये गेल्यामुळं भ्रष्टाचारी लोक पतीत पावन झाले : अंबादास दानवे
सत्तेतील अनेक लोक भ्रष्टाचाराने बरबटले आहे. भ्रष्टाचारी लोकांना निरम्याने स्वच्छ करण्याचे काम आम्ही केले. हे प्रतिकात्मक आंदोलन आम्ही केले. ज्यांच्या ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले ते आज भाजपमध्ये गेले आहेत. भाजपमध्ये गेल्यामुळं ते पतीत पावन झाल्याची प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलं.
भाजपच्या वतीनं देशभर राहुल गांधींच्या विरोधात आंदोलन
राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात एक वक्तव्य केलं आणि यावरुनच आता देशभरात भाजपच्या वतीनं राहुल गांधी यांचा निषेध आंदोलन करण्यात येत आहे. राहुल गांधी यांनी लंडनमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताची लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत असा गंभीर आरोप केला होता. याच वक्तव्यावरुन संसदेत राहुल गांधी यांच्या विरोधात भाजप आक्रमक झाली असून राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी लावून धरली आहे. यावर काँग्रेसच्या वतीने नुकताच राहुल गांधींचा एक फोटो ट्विट करत माफी मागायला सावरकर समजलात का? अशा पद्धतीचे ट्वीट करण्यात आले होते. त्यानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेत राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलनाला सुरुवात केली आहे.