येस न्युज मराठी नेटवर्क : राज्यातील धार्मिक स्थळे पाडव्याच्या मुहूर्तावर उघडण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरून राज्यात राजकारण तापलं आहे. भाजपने या निर्णयाचे श्रेय घेत राज्यात ठिकठिकाणी जल्लोष केला, तर मोदींच्या आदेशामुळेच मंदिरे बंद होती, असा पलटवार राष्ट्रवादीने भाजपवर केला आहे. करोना संसर्ग वाढल्यानंतर लागलेल्या टाळेबंदीच्या काळात मंदिरं बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. आठ महिन्यांनंतर दीपावली पाडव्याच्या मुहुर्तावर राज्यसरकारनं ते उघडण्याचे आदेश दिले. मंदिरे उघडावी म्हणून भाजपने यापूर्वी आंदोलनंही केली होती. दरम्यान, यावरून भाजपा नेते निलेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.
“मंदिरं उघडल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी दिवस उत्साहात साजरा केला. काही महाविकास आघाडी सरकारचे रिकामटेकडे टीका करू लागले की भाजपानं श्रेय घेऊ नये. मूळात महाविकास आघाडी सरकारचा आणि हिंदू धर्माचा काही संबंध शिल्लक राहिलेला नाही,” असं म्हणत निलेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर टीका केली.
करोना संसर्ग वाढल्यानंतर लागलेल्या टाळेबंदीच्या काळात मंदिरे बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. आठ महिन्यांनंतर राज्यसरकारने ते उघडण्याचे आदेश दिले. मंदिरे उघडावी म्हणून भाजपने यापूर्वी आंदोलने केली होती. त्याचा संदर्भ देत भाजपने या निर्णयाचे श्रेय घेत सोमवारी ठिकठिकाणी जल्लोष केला. यावरून मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर घणाघाती टीका केली.
‘भाजपा प्रत्येक गोष्टीत राजकारण करतंय,‘ असं पाटील यांनी नगरमध्ये बोलताना स्पष्ट केले. तसंच मंदिरं उघडण्याचे श्रेय भाजपाला जाऊच शकत नाही. तर हे श्रेय मुख्यमंत्री व राज्य सरकारचं आहे,‘ असेही ते म्हणाले. ‘लॉकडाउनच्या काळात मंदिर बंद करण्याबाबत नरेंद्र मोदी यांनी आदेश दिला होता याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.