येस न्युज मराठी नेटवर्क । राज्यात कोरोना पुन्हा एकदा वाढत असल्याचं दिसत आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून रुग्णवाढीचा वाढता आलेख कायम असून, दिवसेंदिवस तो आणखी वर सरकू लागला आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये संसर्ग होण्याचं प्रमाण वाढलं असून, विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी अनेक जिल्ह्यांमध्ये नाईट कर्फ्यू आणि अंशतः लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. याचसंदर्भात केंद्राने महाराष्ट्र सरकारला पत्र पाठवलं असून, नाईट कर्फ्यू आणि नव्याने लागू केलेला लॉकडाउन परिणामकारक नसल्याचं म्हटलं आहे.

महाराष्ट्रासह देशातील काही राज्यात करोनाचा पुन्हा उद्रेक झाल्यानंतर केंद्राने संबधित राज्यांमध्ये तज्ज्ञांची पथकं पाठवली होती. या पथकांनी राज्यातील करोना प्रसार नियंत्रित करण्याबरोबर काही उपाययोजनासंदर्भात सूचना केलेल्या आहेत. त्याचबरोबर केंद्र सरकारला अहवालही पाठलेला होता. या अहवालानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवलं असून, नाईट कर्फ्यू आणि लॉकडाउनसारख्या उपाययोजना प्रसार रोखण्यात फारशा परिणामकारक नसल्याचं म्हटलं आहे.