सोलापूर : येत्या निवडणुकीमध्ये मतदार मताधिकार बजावण्यासाठी नवमतदारांनी नाव नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे आज 27 ऑक्टोबर रोजी लोकसभा निवडणूकसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून या निमित्त पत्रकार परिषद मध्ये कुमार आशीर्वाद बोलत होते.
निवडणूका पारदर्शक आणि न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्यावतीकरण, शुध्दीकरण अत्यंत महत्वपुर्ण असते. यासाठी निवडणूक आयोगाकडून दरवर्षी विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रम राबविला जातो. आज दिनांक २७ ऑक्टोबर रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये प्रारुप यादी प्रकाशित करुन यंदाच्या विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. सदर कार्यक्रम दि. 27 ऑक्टो ते 9 डिसें या कालावधीत राबविला जाणार आहे. दि. 01 जाने. 2024 रोजी किंवा त्याआधी 18 वर्ष पुर्ण केलेल्या नागरिकाना या कालावधीत आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे. तसेच 2024 च्या एप्रिल, जुलै, ऑक्टोंबर या महिन्यांच्या 1 तारखेला 18 वर्ष पूर्ण होणा-या तरुण तरुणींनाही सदर कालावधीत आगाऊ मतदार नोंदणी करता येईल. मात्र त्या अर्जावरील प्रक्रीया सदर तिमाहीत पुर्ण करणेत येईल. 2024 मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणूकामध्ये मताधिकार बजाविणेसाठी ही मतत्वाची संधी असलेने पात्र नव मतदारांनी नाव नोंदणी करावी, असे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी म्हटले.
प्रारुप यादीमध्ये आपले नाव आहे किंवा नाही याची मतदारांनी खात्री करणे आवश्यक आहे. कारण, बरेचदा ऐन मतदानाच्या दिवशी आपले नांव मतदार यादीमध्ये नाही अशी तक्रार अनेक. मतदारांकडून केली जाते. तसेच आपले नांव, पत्ता, लिंग, जन्म दिनांक, वय, ओळखपत्र क्रमांक, मतदारसंघ इ. तपशिल सुध्दा अचूक आहे का याची खात्री करणे आवश्यक आहे. ज्या मतदारांना सदर तपशिलामध्ये दुरुस्त्या करावयाच्या असतील त्यांनी अर्ज क्रमांक 8 भरावा. विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रमातंर्गत नवीन अर्हता दिनांकावर आगाऊ मतदार नोंदणी करता येते त्याप्रमाणे एखद्याच्या नावा संबधि हरकत सुध्दा घेता येते. एखाद्या मतदारसंघातील एखादा मतदार यादीत दिलेल्या पत्त्यावर राहात नसेल, तर अशा नावा बद्दल त्याच मतदारसंघातील अन्य मतदार आक्षेप घेऊ शकतो. त्यामध्ये जर तथ्य आढळून आले तर पडताळणी करुन संबंधित मतदाराच्या नावाची वगळणी केली जाते. मतदार याद्यांचे अद्यावतीकरण होण्यासाठी अशा अपात्र मतदारांची वगळणीही महत्वाची असते.
नव मतदार नोंदणी, दुरुस्ती व वगळणी यासाठी दि. 4 व 5 नोव्हेंबर, 2023 व दि.24 व 25 नोव्हेंबर, 2023 या दिवशी विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रम राबविला जाणार असून या दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर BLO मतदार यादीसह उपस्थित राहतील. समाजातील काही वचित घटकातील नागरिकांची मतदार यादीमध्ये अल्प प्रमाणात नोंद असलेने त्यांच्यासाठी विशेष शिबिरांचे आयेजन करण्यात आले आहे. दि. 18 व 19 नोव्हेंबर, 2023 या कालावधीमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला व दिव्यांग व्यक्ती यांच्यासाठी विशेष शिबिरे राबविण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या मतदार नोंदणीसाठी महाविद्यालयामधील राष्ट्रीय सेवा योजना व निवडणूक साक्षरता मंडळ यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. महिलांच्या मतदार नोंदणीसाठी महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनज्योती अभियान या शासकिय विभागाची मदत घेण्यात येणार आहे. तर, दिव्यांगासाठी कार्य करणा-या सामाजिक संस्थाच्या मदतीने दिव्यांग व्यक्तींची मतदार नोंदणी, त्यांची मतदार यादीतील नोंद चिन्हाक़ित करणे या गोष्टी करण्यात येणार आहेत. तृतीयपंथी व्यक्ती शरीर व्यवसाय करणा-या स्त्रीया भटक्या विमुक्त जमाती यांच्यासाठी दि. 2 व 3 डिसेंबर, 2023 रोजी विशेष शिबिरे आयेजित केली जाणार आहेत. ही शिबिरे सामाजिक संस्थाच्या सहकार्याने सदर समाज घटकांना सोईच्या ठिकाणी आयोजित केली जाणार आहेत. या समाजघटकाकडे वास्तव्य आणि जन्म तारखेच्या कागदपत्रांची कमतरता लक्षात घेवून निवडणूक आयोगाने त्यांना स्वयं घोषणपत्राची सवलत दिलेली आहे.
त्यामुळे हे समाजातील व्यक्ती आता कोणतेही कागदपत्रे नसले तरीही मतदार नोंदणी करुन शकणार आहेत. जिल्हा परिषद, महानगर पालिका, नगर पालिका, नगर परिषद व नगर पंचायत यांच्या सहकार्याने दि. 31 ऑक्टोंबर, 2023 रोजी सोलापूर जिल्हयामध्ये सर्व ग्रामपंचायत व शहरी भागामध्ये प्रभागनिहाय मतदार यादीचे वाचन केले जाईल. त्याअतंर्गत नव्याने नाव नोंदणीस पात्र नागरिक लग्न होऊन गावात आलेल्या स्त्रीया गावात कायम स्वरुपी वास्तव्यास आलेले नागरिक यांची नाव नोंदणी केली जाईल. तसेच दुबार नावे, मृत व्यक्ती, गावातून कायमस्वरुपी स्थलांतरित झालेल्या व्यक्ती, लग्न होऊन अन्य गावात गेलेल्या स्त्रीया यांच्या नावाची मतदार यादीतून वगळणी केली जाईल. D दि. 05 जानेवारी, 2023 च्या अंतिम मतदार यादीमध्ये एकुण मतदार संख्या पस्तीस लाख श्याहन्नव हजार दोनशे सहा ( 35,96,206) इतकी होती. ही मतदारसंख्या एकुण लोकसंख्येच्या तुलनेत 76.67% इतकी होती. त्यानंतर झालेल्या निरंतर अद्यावतीकरण प्रक्रीयेमध्ये मतदार नोंदणी, नाव वगळणी याबाबी सुरुच होत्या, आता दि.27 ऑक्टोंबर, 2023 रोजी प्रकाशित झालेल्या मतदार यादीमध्ये एकुण मतदार संख्या छत्तीस लाख तेहतीस हजार बहात्तर (36,33,072) इतकी आहे.
ही मतदारसंख्या एकुण लोकसंख्येच्या तुलनेत 77.46% इतकी आहे. यामध्ये 36,866 इतक्क्या मतदारांची वाढ झालेली आहे. भारत हा तरुणांचा देश आहे असे आपण एकीकडे म्हणतो पण मतदार यादीतील त्यांची आकडेवारी कमीप्रमाणात आहे. त्यामुळे, युवा मतदारांची नोंदणी वाढविणेसाठी महाविद्यालयामध्ये विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच, उत्कृष्ट मतदार मित्र महाविद्यालय पुरस्कार, याचेही आयोजन करणेत आले आहे. शंभर टक्के मतदार नोंदणी केलेल्या आणि मतदार जागृतीचे उपक्रम राबविणा-या महाविद्यालयांना हे पुरस्कार दिले जाणार आहेत. तरी नव मतदारांनी आपली नावे येणा-या दि.27 ऑक्टोबर,2023 ते दि. 9 डिसेंबर, 2023 या कालावधीत नोंदवून घेण्यात यावीत असे आवाहन कुमार आशीर्वाद, जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी, सोलापूर यांनी केले.