मुंबई : सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येत नाही तोवर निवडणूक आयोगाने कोणताही निकाल जाहीर करू नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले होते. त्यामुळे पक्ष आणि चिन्हाबाबतचा वाद निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे. या वादावर तोडगा निघावा याकरता शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालायाकडे नवी याचिका केली आहे. निवडणूक आयोगाच्या सुनावणीला स्थगिती देऊ नये, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाकडून करण्यात आली आहे.
विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या 40 आमदारांनी उठाव करत, ठाकरे सरकार खाली खेचले. त्यानंतर शिवसेनेच्या या 40 आमदारांसह अन्य 10 आमदारांना बरोबर घेत एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या मदतीने सरकार स्थापन केले. त्यामुळे शिवसेनेतच दोन गट निर्माण झाले आहे. शिवसेनेतील दोन गटांचा वाद शिगेला पोहोचला आहे. एकीकडे आमदारांच्या अपात्रतेच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. तर दुसरीकडे, खरी शिवसेना कोणाची, हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचला आहे. पण त्याचबरोबर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे देखील यासाठी ठोठावले आहे.