23 हजार 497 घरांचे सर्वेक्षण
सोलापूर : पंढरपूर शहरावर आता डेंग्यू आणि चिकन गुनियाचे नवे संकट आले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने 23 हजार 497 घरांमध्ये कंटेनर सर्वेक्षण केले. यात 2 हजार 767 घरांमध्ये डास आळ्या आढळल्या, तर 1हजार 166 ठिकाणच्या पाणी साठ्यामध्ये एडीस डासाची आळी सापडल्याची माहिती आरोग्य अधिकारी किरण मंजुळ यांनी दिली आहे .
जनसामान्यांच्या मनावर अद्यापही कोरोनाचे दडपण असतानाच आता डेंग्यूची भीती निर्माण होऊ लागली आहे. पावसाळ्याच्या दिवसात ठिकठिकाणी पाण्याची डबकी साठताना दिसत आहेत. त्यात डासांची उत्पत्ती वाढली आहे. नगरपालिकेच्या वतीने 23 हजार 497 घरातील पाण्याचे साठे तपासण्यात आले. त्यात 2767 घरांमध्ये डेंग्यू डासांच्या अळ्या सापडल्या आहेत.
1 हजार 166 पाणी साठ्यात एडिस डासांची अळी
तपासण्यात आलेल्या 14 हजार 119 पाणी साठ्यांपैकी 1 हजार 166 पाणी साठ्यात एडिस डासांची अळी आढळून आली आहे. 25 ऑगस्टपर्यंत शहरातील 17 प्रभागात नगरपालिकेच्या वतीने तपासणी करण्यात आली. त्यात हा चिंताजनक प्रकार समोर आला आहे.
एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन
कोरोनाच्या प्रादुर्भावाने नागरिक हैराण झालेले असताना आता डेंग्यूसारखे नवे संकट समोर दिसायला लागले आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. जुने टायर, फ्रीज, ट्रे अथवा अन्य ठिकाणी घर परिसरात पाणी साठू न देता स्वच्छता ठेवणे अत्यावश्यक बनले आहे. नगरपालिकेच्या वतीने याबाबत दक्षता घेण्यात येत असून नागरिकांनी एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचे नगरपलिकेने आवाहन केले आहे.