नवी दिल्ली : नीटचा पेपर लीक झाला असल्याची कबुली पहिल्यांदाच केंद्र सरकारने दिली असून याप्रकरणी गुन्हा नोंद करून आरोपींनाही अटक केल्याचं सर्वोच्च न्यायालयात सांगितलं आहे. पेपरफुटीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना फायदा झाला त्यांची ओळख पटली असल्याचंही केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितलं आहे.
एकीकडे नीट पेपरफुटीचा तपास सीबीआयने सुरू केला असून दुसरीकडे या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. पेपर रद्द करण्याची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वकिलांनी युक्तिवाद करताना न्यायालयाला सांगितले की, 5 मे रोजी परीक्षा झाली होती आणि निकाल 14 जूनला जाहीर होणार होता. मात्र निकाल 4 जूनलाच जाहीर करण्यात आला. .
विद्यार्थ्यांच्या वतीने युक्तिवाद करताना वकिलांनी सांगितलं की, परीक्षेच्या एक दिवस आधी एका टेलिग्राम चॅनलवर NEET परीक्षेचा पेपर आणि त्याची उत्तरपत्रिकाही देण्यात आली होती. परीक्षा आयोजित करणाऱ्या एनटीएनेही काही विद्यार्थ्यांना चुकीचे पेपर मिळाल्याचे मान्य केले आहे. अशी अनेक प्रकरणे समोर आली ज्यात NEET चा पेपर लीक झाल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी पाटणा येथे एफआयआरही दाखल करण्यात आला आहे.