No Result
View All Result
- सोलापूर – विद्यार्थ्यांनी महाविद्यालय जीवनापासूनच समाजाची गरज ओळखून नाविन्याचा शोध घेत उद्योजकतेकडे वळावे. इनक्युबेशन सेंटर आणि स्टार्टअपच्या माध्यमातून आपल्या कल्पनांना तसेच उद्योगाला चालना देत जीवनात यशस्वी होण्याचे प्रयत्न करावे, असे आवाहन सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी केले.
- सोमवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील इनोव्हेशन, इनक्युबेशन सेंटरच्यावतीने ‘ नॅशनल स्टार्टअप डे’च्या निमित्ताने आयोजित स्टार्टअप यात्रेतील नवोद्योजकांना पारितोषिक वितरण व नवीन दहा स्टार्टअप करार कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक सरदेशपांडे हे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या होत्या. यावेळी व्यासपीठावर उपजिल्हाधिकारी सोपान टोणपे, जिल्हा कौशल्य विकास व रोजगार केंद्राचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी इनोव्हेशन, इनक्युबेशन सेंटरचे संचालक डॉ. सचिन लड्डा यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत केले.
- पोलीस अधीक्षक सरदेशपांडे म्हणाले की, मी देखील स्पर्धा परीक्षेसाठी खूप संघर्ष केला आहे. संघर्ष करूनच आज पोलीस विभागात कार्यरत आहे. वास्तविक 1982-85 च्या काळात शिक्षण घेणाऱ्यांची संख्या फार कमी होती. त्यामुळे त्यावेळी सरकारी नोकरी सहज मिळायची. आज मात्र परिस्थिती फार बदललेली आहे. पोलीस विभागातील वाहन चालक अथवा पोलीस शिपाईसाठी इंजिनिअर एलएलबी अथवा उच्चशिक्षित तरुण अर्ज करीत आहेत. वास्तविक ज्या क्षेत्रातील ज्ञान आपण घेतलो आहोत, त्या क्षेत्रातच करिअर करणे उचित आहे. आज विद्यार्थी इनक्युबेशन सेंटर, स्टार्टअपच्या माध्यमातून उद्योजकतेकडे वळत आहेत, ही खूप आनंदाची बाब आहे. समाजाला भेडसवणाऱ्या समस्यातून मार्ग कडून ज्या गोष्टीची गरज आहे, त्या क्षेत्राचा अभ्यास करून विद्यार्थ्यांनी उद्योजक बनावे आणि इतरांनाही नोकरीची संधी द्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक सरदेशपांडे यांनी केले.
- कुलगुरू डॉ. फडणवीस म्हणाल्या की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील इनोव्हेशन, इनक्युबेशन सेंटरच्या माध्यमातून उद्योजक पिढी निर्माण करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. स्किल इंडिया, स्टार्टअप इंडिया या योजनांना पुढे घेऊन जाण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना उद्योजक बनवण्याकरिता संपूर्ण जिल्ह्यात स्टार्टअप यात्रेचे आयोजन करण्यात आले. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. अनेक आयडियाज, स्टार्टअप आज पुढे आले आहेत. विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या पदवीचा वापर हा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत झाला पाहिजे, अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी काम केले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
- या कार्यक्रमात स्टार्टअप यात्रेत पारितोषिके संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या मध्ये प्रथम पारितोषिक बालाजी पवार आणि टीमने पटकावले, तर यशराज गवळी हा दुसऱ्या क्रमांकाचा विजेता ठरला. पटवर्धन अमेय या विद्यार्थ्यांने तृतीय क्रमांक पटकावला. आकाश मस्के, अमोल पवार, स्मित माने हे उत्तेजनार्थ पारितोषिकाचे मानकरी ठरले.या कार्यक्रमास विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुती देवळे व वनिता सावंत यांनी केले तर आभार श्रीनिवास पाटील यांनी मानले.
No Result
View All Result