सोलापूर, दि.20: प्रत्येक व्यक्तीला त्याच्या अधिकाराविषयी जाणीव करुन देणे आवश्यक आहे. अधिकारासोबत प्रत्येकास कर्तव्याची जाणीव असणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.आर. देशपांडे यांनी केले.
राष्ट्रीय विधी सेवा दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधीकरण, तालुका विधी सेवा समिती बार्शी व राजर्षी शाहू विधी महाविद्यालय आणि विधी सेवा चिकित्सालय बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाईन कार्यक्रमात श्री.देशपांडे बोलत होते.
देशपांडे म्हणाले, अधिकारांचे उल्लंघन झाल्यास त्याची दाद कोठे मिळते याची माहिती पक्षकारास मिळाल्यास अधिकाराचे जतन करणे सोयीचे होते. आर्थिक दुर्बलतेमुळे न्यायालयात दाद मागता येत नसेल तर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा तालुका विधी सेवा समिती यांच्यामार्फत विधी सहाय्य मिळविता येते. सर्वांसाठी न्याय संविधानाने दिलेला मुलभूत अधिकार आहे. कायद्याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहनही त्यांनी केले.
लोकन्यायालय, मध्यस्थी या मार्गाने न्याय मिळविण्याची संकल्पना न्यायाधीश आर.एस.पाटील यांनी विषद केली. सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निवाड्याचा हवाला देत संकल्पना समजावून सांगितल्या. विद्यार्थ्यांनी न्यायनिवाड्याविषयीचे ज्ञान मिळवावे, असे त्यांनी आवाहन केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एस.आर.मोकाशी यांनी न्याय सर्वांसाठी या संकलपनेमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले. विधी सेवा मिळणेस पात्र व्यक्ती, विधी सेवामध्ये अंतर्भूत असणाऱ्या विविध सेवा, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कामकाज याविषयी त्यांनी माहिती दिली.
प्रारंभी राजर्षी शाहू विधी महाविद्यालयाचे प्राचार्य एम.कृष्णमूर्ती यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी विधी सेवा प्राधिकरण कायद्याचा उद्देश स्पष्ट केला.