सोलापूर :- आषाढी वारी नमित्त संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात दिनांक 11 जुलै 2024 रोजी धर्मपुरी येथे आगमन झाले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील व जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत माऊली पालखीचे स्वागत केले. पालखीसोबत किमान चार लाख वारकरी पायी चालत आहेत.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीचा पहिला मुक्काम नातेपुते नगरपंचायत येथे असतो. नातेपुते नगरपंचायतीचे मुख्याधिकारी माधव खांडेकर हे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली पालखीतील वारकऱ्यांना अत्यंत चांगल्या सोयी सुविधा देण्यासाठी मागील दोन महिन्यापासून नियोजन करत होते. पालखी मुक्कामी महिलांना स्नानाबाबत खूप अडचणी येतात. त्यासाठी नगरपंचायतीने 58 स्वतंत्र स्नानगृहे उपलब्ध करून दिलेली होती. अशाच अनेक नाविन्यपूर्ण सुविधा नगरपंचायतीच्या वतीने देण्यात आल्यामुळे पालखीतील वारकरी व भाविक या सुविधाबद्दल खूप समाधानी होते. वारकऱ्यांचे समाधान हेच प्रशासनाने उत्कृष्ट काम केल्याची पावती होय.
नातेपुते नगरपंचायतीने वारकऱ्यांसाठी उपलब्ध केलेल्या अन्य सुविधा पुढीलप्रमाणे…
स्वच्छता– मागील एक महिन्यापासून पालखी तळाची स्वच्छता ,झाडेझुडपे काढणे,मुरुमीकरण करणे, गावामध्ये ज्या ठिकाणी दिंड्या थांबतात त्या ठिकाणी स्वच्छता करून देणे, गावामध्ये जंतुनाशक धूर फवारणी करणे इत्यादी स्वच्छता विषय कामे वेळेत पूर्ण करण्यात आले त्यासाठी नगरपालिकेचे 75 सफाई कर्मचारी पूर्ण वेळ काम करत होते.
मोबाईल टॉयलेट – एकूण 20 ठिकाणी 1800 मोबाईल टॉयलेट बसविण्यात आले होते, सदर शौचालयाचे वेळोवेळी साफसफाई जेट्टिंग मशीन च्याय सहायने करण्यात आली. शौचालयाचा प्रत्येक ठिकाणी 15 स्वच्छालय मागे एक सफाई कर्मचारी व 25 टॉयलेट मागे एक सुपरवायझर नेमण्यात आला होता. त्यावर नगरपंचायत च्या कर्मचाऱ्यांचे नियंत्रण ठेवण्यात आले होते. यामुळे सर्व टॉयलेट ठिकाणी पाणी स्वच्छता या सुविधा उपलब्ध झाले. वॉकी टॉकी च्या साह्याने नगरपंचायत नियंत्रक अधिकारी व मोबाईल टॉयलेट सुपरवायझर यामध्ये संवाद ठेवण्यात आला होता. सुलभ इंटरनॅशनल ची 40 शौचालय व स्नानगृह मोफत वारकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आले होते.शौचालयाला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकर साठी स्वतंत्र फीडिंग पॉइट ठेवण्यात आला होता त्यामुळे टँकर वेळेवर भरून स्वच्छालय ठिकाणी येत होते
महिला वारकऱ्यांसाठी विशेष सुविधा – जिल्हाधिकारी महोदय यांच्या निर्देशामुळे महिला वारकऱ्यांना विशेष सुविधा देण्यावर भर देण्यात आलेला होता. यामध्ये महिला वारकऱ्यांसाठी तात्पुरते स्वतंत्र स्नानगृह तयार करण्यात आले होते, पालखीतळाच्या बाजूला एकूण 58 स्वतंत्र महिला स्नानगृहामध्ये महिलांसाठी शॉवरच्या माध्यमातून अंघोळीची सोय करण्यात आली होती , त्याचबरोबर स्वतंत्र चेंजिंग रूमही तयार करण्यात आले होते. याचा लाभ हजारो महिला वारकऱ्यांनी घेतला व प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या सोयी सुविधा बद्दल आभार व्यक्त केले. या बरोबरच पुरुषांसाठी स्वतंत्र तीस शावर उभारण्यात आलेले होते .
सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन – महिलांसाठी सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन बसविण्यात आले होते या माध्यमातून महिलांना मोफत सॅनिटरी पॅड नगरपंचायतीच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आले.
हिरकणी कक्ष – लहान मुलांसाठी व स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष उभारण्यात आला होता .त्या ठिकाणी पाळणाघर, दूध सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती .त्याचबरोबर त्या ठिकाणी राज्य शासनाच्या महिलांसाठी असलेल्या योजनांची माहिती अंगणवाडी सेविका च्या माध्यमातून वारकऱ्यांना देण्यात येत होती. अशा सेविकांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची माहिती वारकऱ्यांना करून दिली
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांची पाहणी
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांनी प्रशासनाच्या वतीने नातेपुते नगरपंचायत हद्दीत महिला वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची पाहणी केली. रूपालीताई चाकणकर यांनी महिला स्नानगृह तसेच हिरकणी कक्षाचे उद्घाटन केले. सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन तसेच महिला स्नानगृह याची पाहणी करून समाधान व्यक्त केले. यावेळी जिल्हा प्रशासन प्रमुख जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व नातेपुते नगरपंचायत मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी भाविकांसाठी विशेषता महिला भाविकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या सुविधाबाबत श्रीमती चाकणकर यांनी कौतुक केले. राज्य महिला आयोग महिला वारकऱ्यांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा देण्याचे प्रयत्न करीत असल्याबाबत सांगितले.
मोबाईल चार्जिंग कक्ष – आजच्या काळाची गरज लक्षात घेऊन व वारकऱ्यांची होत असलेली अडचण लक्षात घेऊन नगरपंचायत व महावितरण चे वतीने पालखीतळावर मोबाईल चार्जिंग कक्ष उभारण्यात आलेला होता. पत्रा शेडमध्ये मोबाईल चार्जिंग साठी अनेक पॉईंट काढून देण्यात आले होते याचा लाभ अनेक वारकऱ्यांनी घेतला व समाधान व्यक्त केले.
कचराकुंड्या – पुणे पंढरपूर रस्त्यावर तसेच पालखी तळावर ठीक ठिकाणी कचरा गाड्या उभा करण्यात आल्या होत्या व त्या ठिकाणी सफाई कर्मचारी थांबून वेळोवेळी पडलेला कचरा उचलत होते त्यामुळे साफसफाईवर ताण निर्माण झाला नाही व वारकऱ्यांना त्रास झाला नाही.
पाणीपुरवठा – ज्ञानेश्वर माऊली पालखी मार्गावर शासनामार्फत एकूण 76 टँकरच्या माध्यमातून वारकऱ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे. वारकऱ्यांना चांगले आणि शुद्ध पाणी पिण्यासाठी उपलब्ध व्हावे म्हणून नगरपंचायतीमार्फत एकूण आठ ठिकाणी टँकर फीडींग पॉईंट ची सोय करण्यात आली होती त्यामध्ये टीसीएल टाकून पाणी टँकर मध्ये भरणा केले जात होते.
विद्युत रोषणाई – पालखीतळावर एकूण 15 हाय मस्ट व्यतिरिक्त 400 वॅटचे एकूण 42 दिवे जनरेटर च्या साह्याने चालू करून विद्युत पुरवठा करण्यात आला. त्यामुळे वारकऱ्यांना त्रास झाला नाही.
जेसीपी मधून पुष्पृष्टी करून माऊलींचे स्वागत
जिल्हा प्रशासनाच्या वतीने आषाढी वारीमध्ये सोलापूर जिल्ह्यात येणाऱ्या वारकरी व भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. नातेपुते नगरपंचायतीने प्रथमच महिलांसाठी स्वतंत्र 58 स्नानगृहे पाण्याच्या सुविधेसह उपलब्ध करून देऊन महिला वारकऱ्यांना कोणतही त्रास होणार नाही याची काळजी घेतली. सोलापूर जिल्हा प्रशासन स्थानिक प्रशासनाला सोबत घेऊन वारकऱ्यांच्या सेवेत अत्यंत चांगले काम करत आहे.