येस न्युज मराठी नेटवर्क : नाशिकची आता कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरुय. 39 टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज आढळून आल्या असून शहरातील कोविड सेंटर्सही महापालिकेकडून बंद करण्यात आले आहेत. नाशिक शहर हे एकेकाळी कोरोनाचा हॉटस्पॉट बनले होते. एप्रिल महिन्यात नाशिकमध्ये पहिला रुग्ण आढळून आला होता त्यानंतर टप्प्याटप्याने कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत गेली होती.
जुलै महिन्यापासून तर दिवसागणिक हजारावर रुग्ण रुग्णालयात दाखल होत होते. खाजगी रुग्णालयात बेड्स देखील उपलब्ध होत नसल्याने रुग्णाच्या नातेवाईकांना वणवण फिरावे लागत होते. एवढेच नाही तर कोरोनामुळे रोज अनेकजण दगावत होते. मृत्यूनंतरही अंत्यसंस्कारासाठी अमरधाममध्ये मृतदेहाला प्रतीक्षा करावी लागत होती अशी भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. जिकडे जाईल तिकडे महापालिकेचे प्रतिबंधित क्षेत्राचे फलक, बॅरिकेट्स आणि पोलिसांचा पहारा नजरेस पडत होता.
कोरोनाचे हे संकट कधी दूर होईल याचीच नाशिककर वाट पाहत असतांनाच 2021 सालच्या जानेवारी महिन्यात हे चित्र बदलतांना दिसतंय. एकेकाळी जिथे रोज आठशे ते हजार रुग्ण आढळून येत होते तिथे आज सरासरी शंभर रुग्ण दिसून येताहेत आणि त्यामुळेच कोरोना नियंत्रणात आल्याने तसेच शासकीय रुग्णालयातील बेड्स रिक्त होण्याचे प्रमाण वाढल्याने शासनाच्या सुचनेनूसार शहरातील कोविड सेंटर आता बंद करण्यात येत असून महापालिकेचे समाजकल्याण आणि मेरी वसतीगृहातील कोविड सेंटर पाठोपाठ ठक्कर डोम या जम्बो सेंटरलाही आता टाळे ठोकण्यात आले आहे. ऑगस्ट महिन्यात हे सेंटर सुरु करण्यात आले होते 90 डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी इथे कार्यरत होते.