नाशिक-नगर-मराठवाडा पाणी संघर्ष मिटणार असून याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची घोषणा केली आहे.
पश्चिमी वाहिनीचे पाणी दरवर्षी समुद्रात वाहून जाते. मात्र आता हे पाणी मराठवाड्याकडे वळवले जाणार आहे. यासाठी पाचशे किमीच्या टनेलद्वारे पाणी गोदावरी खोऱ्यात आणले जाईल. विदर्भातही पूर्व भागातून पश्चिम विदर्भात याच पद्धतीने वाहून जाणारे पाणी वळवले जाणार आहे. याद्वारे महाराष्ट्रासह मराठवाड्याला कायमस्वरुपी दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न असेल. यासाठी एक लाख कोटीचा खर्च असला तरी महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी केली.
नाशिकमध्ये दोन दिवशीय महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत असताना त्यांनी मराठवाड्याला दुष्काळ मुक्त करण्याचा संकल्प बोलून दाखवला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना म्हटले की, 2019 नंतर त्यांनी कुठल्याही प्रकल्पासाठी प्रयत्न केले नाही. त्यांनी सांगावे की, आम्ही राज्यासाठी काय केले. 2017 मध्ये मुख्यमंत्री असताना पश्चिमी वाहिन्यांद्वारे वाहनारे पाणी मराठवाड्याकडे आणण्यासाठी काय करता येईल, याचा अभ्यास करुन त्याचा अहवाल तयार केला. त्यासाठी जल मंडलाची मान्यता घेतली. नंतरच्या महाविकास आघाडी सरकारने मात्र या फाइलीवरील धूळही झटकली नाही. यांना घाई होती, की समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवून प्रकल्प मार्गी लावण्याची. केवळ डीपीआर करुन मंजुरी मिळवायची होती. मात्र त्यांना ते करायचे नव्हते, असा टोलाही महाविकास आघाडीला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
मात्र मागील सहा महिन्यात शिंदे भाजप सरकार येताच याचवर्षी या प्रकल्पाची निवीदा काढून हे पाणी गोदावरी खोऱ्यात आणायचे ठरवले आहे. नाशिक-नगर-मराठवाडयात पाण्यावरुन होणारा संघर्ष देखील यातून टाळता येणार असल्याचे त्यांनी म्हटले. विदर्भातील दुष्काळी पट्यात नळगंगा, वैनगंगाच्या माध्यमातून वाहून जाणारे पाणी वळवून पूर्व विदर्भाचे पाणी पश्चिम विदर्भात आणायचे आहे. या प्रकल्पांमुळे खऱ्या अर्थाने राज्यात जलक्रांती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचा निर्णय फडणवीस यांनी म्हटले. कोल्हापूर व सोलापूरमध्ये दरवर्षी येणारा पूर रोखण्याकरिता जागतिक बँकेशी बोलणे सुरु असून या शहरातील पुराचे पाणी वळण बंधाऱ्याचे पाणी तसेच टनेल व उजनीच्या माध्यमातून दुष्काळी मराठवाड्यात वळवण्यासाठी काम करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
नाशिकमध्ये लवकर निओ मेट्रो येणार
समृद्धी महामार्गानंतर यावरच आम्ही थांबणार नसून आता नागपूर गोवा महामार्गाचा प्रकल्प राबवणार आहोत. या महामार्गामुळे अविकसीत मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांचा विकास होणार आहे. इकोनॉमिक कॉरिडोर होणार आहे. तसेच पुणे-नाशिक सेमी हायस्पीड ट्रेनचे काम लवकरच होणार असून डीपीआर तयार झाला आहे. हा मार्ग झाल्यास याद्वारे शेतकरी मालाकरिता, कार्गो, जलद कनेक्टीव्हीटीकरिता मोठा फायदा होउन इकोनॉमिक कॉरिडोर उभा करणार आहोत. तसेच नाशिकमध्ये लवकर निओ मेट्रो येणार आहे. पुढच्या आठवड्यात प्रेझेनटेशन केले जाणार असून निओ मेट्रो मेक इन इंडिया तत्वार सुरु होणार आहे. वंदे भारत ट्रेन सुरु झाली असून मेक इन इंडिया प्रोग्रामद्वारेच या ट्रेनची निर्मिती लातुर येथेच केली जाणार असल्याचे फडणवीस यांनी म्हटले.