सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला आजपासून पुन्हा सुरुवात झाली आहे. नारायण राणे यांना अटक झाल्यामुळे त्यांची जनआशीर्वाद यात्रा स्थगित झाली होती. न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर आता पुन्हा एकदा राणे जनतेचा आशीर्वाद मागायला जात आहे. आजपासून राणे तीन दिवसीय कोकण दौऱ्यावर आहेत.
योद्धा पुन्हा मैदानात…..!
मुख्यमंत्र्यांवर बोलताना राणेंना अपशब्द वापरला आणि त्यानंतर झालेला राडा सगळ्या देशाने पाहिला. आता हे सगळं पाठीमागे सोडून राणे पुन्हा एकदा जनआशीर्वाद घ्यायला बालेकिल्ल्यात जात आहेत. सिंधुदुर्ग तसंच कणकवली शहरात राणेंचं जंगी स्वागत करण्यासाठी राणे समर्थकांनी कंबर कसलीय. योद्धा पुन्हा मैदानात, अशा आशायचे बॅनर्स शहरभर लागले आहेत. या बॅनर्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राणेंचा फोटो आहे.
भाजप आमदार नितेश राणे यांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन एक फ्लेक्स शेअर केला आहे. ज्यामध्ये राणेंच्या तीन दिवसीय कोकण दौऱ्याचा उल्लेख करण्यात आलाय. राणे आज रत्नागिरी जिल्ह्यात असतील तर पुढचे दोन दिवस सिंधुदुर्गात असतील. नितेश राणेंनी शेअर केलेल्या फ्ले्क्सवरदेखील योद्धा पुन्हा मैदानात, असे लिहिले आहे.राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेसाठी येणाऱ्या विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांचा दौरा अचानक रद्द झालेला आहे. आजचा होणारा दौरा रद्द झाल्याचे प्रशासनातर्फे सुचित करण्यात आले आहे. यापाठीमागील ठोस कारण आणखी समजू शकलेले नाही.