येस न्युज मराठी नेटवर्क : भाजपचे राज्यसभा सदस्य नारायण राणे आणि शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यात सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जोरदार शाब्दिक चकमक झडली. बैठक पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला स्थानिक खासदार विनायक राऊत, नारायण राणे, आमदार नितेश राणे, वैभव नाईक व अन्य प्रमुख लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत भाजपचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजन म्हापसेकर यांनी तिलारी धरणाचा डावा कालवा फुटल्यावरून आपली भूमिका मांडली. त्यावर शिवसेनेचे सदस्य बाबुराव धुरी यांनी जोरदार आक्षेप घेतला. राणे बोटाने इशारा करत राऊत यांना सुनावत होते. राणे यांनी काही जिल्हा परिषद सदस्यांचा एकेरी उल्लेख केल्याने वाद अधिक चिघळला. राऊत हेसुद्धा जागेवरून उभे राहिले व त्यांनी राणे यांना प्रत्युत्तर दिले. त्यानंतर दोघांच्या समर्थकांनीही सभागृहात गदारोळ सुरू केला. तणाव वाढल्याचे लक्षात घेऊन पालकमंत्री उदय सामंत यांनी हस्तक्षेप केला व सर्वांना शांतता बाळगण्याची विनंती केली. त्यानंतर वातावरण निवळले.