मुंबई : केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. रुटीन चेकअपसाठी नारायण राणे रुग्णालयात गेल्याच सांगण्यात येत आहे. राणेंची जन आशिर्वाद यात्रा सुरु आहे. उद्या ते या यात्रेसाठी जाणार आहेत.
मात्र त्यापूर्वी रुटीन चेकअपसाठी नारायण राणे रुग्णालयात पोहोचले. दरम्यान, शिवसेनेसोबतचा वाद, भाजपची जनआशिर्वाद यात्रा, त्यादरम्यान झालेली अटकेची कारवाई या सर्व पार्श्वभूमीवर नारायण राणेंचा रक्तदाब अर्थात बीपी वाढला होता. याशिवाय नारायण राणेंना मधुमेहाचाही त्रास आहे. राणेंना दोन दिवसापूर्वीच त्रास जाणवत होता. त्यावेळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता.
नारायण राणेंना बीपी आणि शुगरचा त्रास
नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने महाराष्ट्रभर वादंग माजलं होतं. या सगळ्या प्रकरणी त्यांना अटकही झाली होती. पाच ते सहा तासांनंतर त्यांना जामीन मिळाला. याचदरम्यान राणे यांची प्रकृती बिघडली होती. राणेंना बीपी आणि शुगरचा त्रास आहे. त्याच्यावरील उपचार ते घेत आहेत.
अटकेवेळी नारायण राणेंना बीपीचा त्रास
नारायण राणे यांना अटक करण्यात आलं होतं. यावेळी त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यांच्या शरीरातील साखरेचे तसेच रक्तदाबाचे प्रमाण वाढले होते . प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांनी त्यांची प्राथमिक तपासणी केली . नंतर राणेंचा त्रास कमी झाला.