येस न्युज नेटवर्क : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारची ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजना यंदा सुरू होणार आहे. त्यातून शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून दर चार महिन्यांतून एकदा दोन हजार रुपये, असे वर्षात तीन हप्त्यांत सहा हजार रुपये मिळणार आहेत. मेअखेरीस राज्याचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. दुसरीकडे, १ फेब्रुवारी २०१९ पूर्वी ज्यांच्या नावे शेतजमीन आहे, तेच योजनेसाठी पात्र असतील. मात्र, पीएम किसान सन्मान निधीचा दोन हजार रुपयांचा हप्ता ज्या बँक खात्यावर जमा होतो, ते बँक खाते आधार नंबर आणि मोबाईल नंबरशी लिंक करणे बंधनकारक आहे. राज्यातील १२ लाख शेतकरी असे आहेत, की ज्यांचे बँक खाते अजूनही आधार नंबर आणि मोबाईल नंबरशी लिंक नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी त्वरित त्यांचे बँक खाते आधार व फोन नंबरशी लिंक करून घ्यावे; अन्यथा त्यांना राज्य सरकारच्या योजनेचे पैसे मिळू शकणार नाहीत.