सोलापूर : शहर व जिल्ह्यामध्ये ‘माझे मुल माझी जबाबदारी’ हे अभियान होटगी येथे सुरू करण्यात आल्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. कोरोना च्या तिसऱ्या संभाव्य लाटेमध्ये शून्य ते अकरा वयोगटातील मुलांना धोका असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे , त्यामुळे सोलापुर जिल्ह्यातील अशा मुलांचा सव्हें करण्यात आलेला आहे. पालक व शिक्षकांना मुलांची काळजी कोणत्या पद्धतीने घ्यायची याबाबत मार्गदर्शन करणारे पुस्तक सोलापूर जिल्हा परिषदेने तयार केले आहे , अशी माहिती पालकमंत्री भरणे यांनी दिली. प्राथमिक आरोग्य केंद्र उपजिल्हा रुग्णालय तसेच शासकीय रुग्णालयात लहान मुलांसाठी बेडची उपलब्धता वाढवण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ‘माझे मुल माझी जबाबदारी’ या अभियानाचा तसेच ‘माझा विद्यार्थी माझी जबाबदारी’ या अभियानाचा प्रारंभ करणारा सोलापूर हा राज्यातील पहिला जिल्हा असल्याचेही भरणे यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात दीडशे पथके तयार करण्यात आली असून लहान मुलांना औषधोपचार करण्यासाठी जिल्ह्यातील डॉक्टरांचे सहकार्य घेणार असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुलांना औषधे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले . शहरातील कोरोना बाधितांची संख्या घटली असली तरी अद्याप जिल्ह्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या जास्त असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.