सोलापूर – दुर्लभ सुंदरी वाद्य कला अकादमी, केंद्र शासन सांस्कृतिक मंत्रालय आणि येस न्युज मराठीच्या वतीने 20 व 21 फेब्रुवारी रोजी सोलापुरातील हिराचंद नेमचंद वाचनालयातील अंफी थिएटर येथे संगीत प्रतिभा महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भीमन्ना जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली .
दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात सोलापूरकरांना भारतातील विविध राज्यांमधील उदयोन्मुख कलावंतांची सुंदरी ऐकण्याचा आनंद उठवता येणार आहे. शनिवार दि.२० फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता कलाश्री जाधव, निषाद जाधव, मयुरेश जाधव आणि शंकुतला जाधव हे सामूहिक सुंदरी वादन करणार आहेत. त्यानंतर मुंबईचे निनाद मुळगावकर हे बासरी वादन तर कलकत्त्याचे कल्याण मुजुमदार हे सितार वादन करणार आहेत. दिल्लीची मलावीका अजित कुमार मोहिनीअट्टम सादर करणार आहेत. मुंबईच्या पूजा मोरे व सई कानडे कथक सादर करणार आहेत.
रविवारी दि.२१ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता व्यंकटेश माने, गुरुनाथ जाधव, नरेंद्र बजंत्री हे सामूहिक सुंद्री वादन करणार आहेत. त्यानंतर आदित्य खाडवे आणि सारंग कुलकर्णी हे शास्त्रीय गायन आणि हार्मोनियम सादर करतील. बंगळूरूच्या अंजना शर्मा यांच्या भरतनाट्यम सादरीकरणानंतर वैष्णवी सुंदरम, सोनवी मेहंदळे आणि सानिका जोशी यांचे सामूहिक कथक होणार आहे.
दरम्यान, २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५. ३० वाजता महोत्सवाचे उदघाटन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, स्मार्ट सिटीचे सीईओ त्र्यबंक ढेंगळे पाटील, महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे, डॉ.व्ही. एच. कुंभार आदींच्या उपस्थितीत होणार आहे.