No Result
View All Result
- आता होळीच्या सणाची चाहूल लागली आहे. होळी हा सण आनंदाचा, उत्साहाचा, एकमेकांवर रंग उधळण्याचा. होळी हा भारतातील सर्वात प्रमुख आणि आनंदी सणांपैकी एक आहे. यातच धूलिवंदन आधी होलिका दहन केलं जातं. दरवर्षी होलिका दहनसाठी मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जातात. यामुळे झाडांचा नाश तर होतोच शिवाय मुंबईसारख्या दाटीवाटीच्या शहरात जेथे झाडांची अतिशय आवश्यकता आहे, तेथे झाडांची संख्या कमी होऊन पर्यावरणालाही हानी पोहचते. तसेच ज्या व्यक्तींनी व सेवाभावी संस्थानी ती झाडे लावण्यासाठी व वाढविण्यासाठी परिश्रम घेतले आहेत, त्याचीही निराशा होते. असं झाल्यास अनेक संस्थांकडून पोलिसात तक्रार देखील दाखल करण्यात येते. अशातच मुंबई पोलिसांनी नागरिकांना होळी साजरी करा पण झाडे तोडू नका, असं आवाहन केलं आहे.
- मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी आपल्या सर्व पोलीस ठाण्यांना आदेश जारी केले आहेत की, कोणीही झाड तोडताना आढळल्यास त्या नागरिकावर कारवाई करण्यात यावी. झाडे तोडणे हा गुन्हा असून कोणीही दोषी आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. महाराष्ट्र (शहर विभाग ) झाडे संरक्षण कायदा, 1951 प्रमाणे झाडे तोडणे हा गुन्हा आहे. या कायद्याचे उल्लंघन झाल्यास उपरोक्त कायदयाच्या कलम 21 प्रमाणे कमीत कमी रूपये 1,000/- व जास्तीत जास्त रूपये 5,000/- एवढी दंडाची शिक्षा असून कमीत कमी एक आठवड्याच्या कारावासाची शिक्षा सुद्धा होऊ शकते.
- पोलिसांची जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे की, जेथे यापूर्वी असे प्रकार घडले आहेत, अशा सर्व ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवावा. जेणेकरून होळी साजरी करण्यासाठी झाडांवर कुऱ्हाड चालविली जाणार नाही. विशेषतः पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्गावर रस्त्याच्या बाजला, जेथे अनेक खाजगी व सार्वजनिक संस्थानी पुष्कळ झाडे लावलेली आहेत, तेथे पोलीस गस्त ठेवावी. पोलीस ठाण्यातील जनसंपर्क अधिकाऱ्यांनी ज्या विभागात झाडे तोडण्याची शक्यता आहे, अशा सर्व विभागात अगोदरच जाऊन ज्या व्यक्ती झाडे तोडण्यात भाग घेण्याची शक्यता आहे. अशांना झाडे किंवा झाडांची फांदी तोडू नये म्हणून सक्त ताकीद द्यावी, असं सांगण्यात आलं आहे.सर्व पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दक्ष राहून झाडे तोडण्याची तक्रार त्यांच्याकडे आली किंवा तसे त्यांच्या निदर्शनास आले तर त्याबाबत त्वरित योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, असं या आदेशात सांगण्यात आलं आहे.
- दरम्यान, होळीच्या निमित्ताने फ्रेंड्स ऑफ ट्रीज, ट्री अँथोरीटी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (BNHS)] वर्ल्ड वाईल्ड लाईफ (WWL) इ. सेवाभावी संस्थाचे कार्यकर्ते अनधिकृतपणे वृक्षतोड होऊ नये म्हणून शहरातील विविध भागात गस्त घालत असतात. वृक्षतोड करणाऱ्यांविरुद्ध त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यास तक्रार केल्यास सदर तक्रारीची त्वरीत दखल घेऊन वृक्षतोड करणाऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात येते.
No Result
View All Result