येस न्युज नेटवर्क : मुंबई महापालिकेच्या निवडणूक आम्ही लांबवल्या नाहीत. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने अनेक याचिका दाखल केल्यामुळेच लांबल्या आहेत, असा आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसंच ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये बीएमसी निवडणुका होतील, असा अंदाजही देवेंद्र फडणवीस यांनी वर्तवला. एएनआय या वृत्तसंस्थेच्या पॉडकास्टमध्ये देवेंद्र फडणवीस बोलत होते. देवेंद्र फडणवीस यांनी 29 जून रोजी ही मुलाखत एएनआयला दिली होती.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आम्ही निवडणुका लांबवल्या नाहीत. निवडणुका व्हाव्यात असं आम्हालाही वाटतंय. उद्धव ठाकरेंच्या पक्षाने भरपूर याचिका न्यायालयात दाखल केल्या आहेत, आरक्षणाबाबतची एक याचिका सुद्धा आहे. सर्वोच्च न्यायालयाने सर्व याचिका एकत्र केल्या आहेत आणि स्टेटस को दिला आहे. या स्टेटस कोमुळे निवडणुका होऊ शकल्या नाहीत. ज्यावेळी स्टेटस को हटेल आणि निकाल येईल तेव्हा निवडणुका होतील. उद्धवजी बोलतात की तुम्ही निवडणुका का घेत नाही तेव्हा मला आश्चर्य वाटतं. तुम्ही याचिका दाखल केल्या आहेत, तुम्ही त्या मागे घ्या. स्टेटस को हटेल. दोन्ही बाजूंनी का बोलता? हे राज्य सरकारच्या हातात नाही. माझ्या अंदाजाने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निकाल येईल आणि निवडणुका पण होतील.”