सांगली ( सुधीर गोखले) – जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला मोहरम सण राज्यभर प्रसिद्ध आहे तो इथे होणाऱ्या गगनचुंबी ताबुतांच्या भेटीसाठी. येत्या शनिवारी या भेटी होणार असून लाखो भाविक या भेटीसाठी गोळा होत असतात त्या दृष्टीने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. कडेगाव मधील नागरिकांनी सुमारे १५० वर्षांपासून हि परंपरा सुरु ठेवली असून हिंदू मुस्लिम समाजातील ऐक्याचा एक आदर्श राज्यासमोर ठेवला आहे. या मोहरम सणाचे वैशिष्ट म्हणजे हा सण येथील ब्राह्मण संस्थानिक श्रीमंत भाऊसाहेब देशपांडे यांनी सुरु केला तर येथील तत्कालीन मुस्लिम संत सय्यद पीर साहेब हुसेन पिरजादे यांनी आपल्या काव्यामधून हिंदू मुस्लिम समाजातील ऐक्यासाठी जनजागृती केली सुमारे १८०० शतकापासून या उंच ताबूतांची स्थापना होत आहे बकरी ईद नंतर या ताबूतांची बांधणी सुरु होते. प्रतिपदेच्या चंद्रा ला या ताबुतांच्या उभारणीला सुरुवात होत असते.
आधी कळस …. वास्तू शास्त्रानुसार ताबूत उभारणी
येथील ताबूत उभारणीचे एक आगळेवेगळे वैशिष्ट आहे. आधी कळस मग पाय या म्हणी प्रमाणे येथील ताबूतांची उभारणी होत असते साधारण चौदा ताबूतांची उभारणी केली जाते त्यापैकी हिंदू समाजाचे निम्मे ताबूत असतात हे विशेष आहे. या ताबूतांची उंची सुमारे १४० फुटापर्यंत असते. हे ताबूत बांबू आणि चिकण माती च्या साहाय्याने सुताचा वापर करून उभारले जातात. आणखी एक वैशिष्ठ म्हणजे या ताबुतांच्या उभारणीमध्ये सुताला कोठेही गाठ दिली जात नाही तर या ताबूतांची उभारणी करत असताना अष्टकोनी आकारात वास्तुशास्त्रा चा आधार घेतला जातो. त्यावर रंगीत कागद लावून आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते. ताबुतांच्या उभारणी मध्ये सर्वधर्मीय युवक हिरारीने सहभाग घेत आहेत.