नांदेड : नांदेडचे खासदर वसंत चव्हाण यांचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर हैदराबाद येथील किम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मध्यरात्री त्यांची तब्येत अचनाक बिघडली. त्यावेळी त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अखेर पहाटे 4 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
काही दिवसांपूर्वी नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांची प्रकृती अचानक खालावली होती. त्यामुळे त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. हैदराबाद येथील किम्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. वसंत चव्हाण यांना श्वास घेण्यास अडचण होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तसेच, त्यांना लो बीपीचाही त्रास होत होता. मध्येच त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना सुरुवातील नांदेड येथील रुग्णालयात त्यांना दाखल केलं. काही काळ तिथे उपचार घेतल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानं वसंच चव्हामांना हैदराबाद येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं. त्यानंतर वसंत चव्हाण यांना उपचारासाठी एअर अॅम्ब्युलन्सनं हैद्राबाद येथील रुग्णालयात हलवण्यात आलं.
दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांची कारकीर्द
वसंत चव्हाण खासदार होण्याआधी महाराष्ट्र विधानसभेवर अपक्ष म्हणून निवडून गेले होते. त्यांनी नायगाव विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्यांनी 2014 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. याशिवाय मे 2014 मध्ये त्यांची विधानसभेच्या लोकलेखा समितीवर नियुक्ती करण्यात आली होती. ते जनता हायस्कूल आणि अॅग्रीचे अध्यक्षही होते.
नांदेड जिल्ह्यात 2009 साली नायगाव विधानसभा मतदारसंघाची नव्यानं निर्मिती झाल्यानंतर या मतदारसंघाचे पहिले आमदार वसंतराव चव्हाण ठरले. नांदेडमध्ये अशोक चव्हाण-भास्करराव खतगावकर या नेत्यांविना काँग्रेस जिंकू शकते, हे त्यांनी मोठ्या आश्वासकतेनं सिद्ध करत नांदेडमधील काँग्रेसचे वर्चस्व कायम राखलं. वसंत चव्हाण 1978 साली आपल्या नायगाव या गावचे पहिल्यांदा सरपंच झाले. त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेवरही काम केलं. 2002 साली ते जिल्हा परिषदेवर निवडून आले होते, पण नंतर लगेचच त्यांना राज्य विधान परिषदेवर संधी मिळाली. तिथून पुढे तब्बल 16 वर्ष ते विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात कार्यरत होते. नायगाव या गावात एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मोठा शैक्षणिक विस्तार केला आहे.