येस न्युज नेटवर्क : यंदा मान्सून उशिराने दाखल होण्याचा अंदाज आहे. हवामानाची माहिती देणारी स्कायमेट वेदर या खासगी संस्थेने हा अंदाज वर्तवला आहे. मान्सून अंदमानमध्ये साधारणत: 22 मे रोजी दाखल होत असतो. मात्र यंदा त्याची सुरुवात कमकुवत दिसत आहे. त्यामुळे यंदा मान्सून अंदमानमध्ये विलंबाने दाखल होण्याचा अंदाज स्कायमेटच्या शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे.
केरळात नैऋत्य मान्सून साधारणपणे 1 जून रोजी दाखल होत असतो, मात्र नैऋत्य मान्सूनसंदर्भात आताच सांगणं कठिण असल्याचं मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केलं आहे. तर भारतीय हवामान विभागाकडून पुढील एक ते दोन दिवसात अंदमानात मान्सून कधीपर्यंत दाखल होईल या संदर्भातली माहिती दिली जाणार आहे. स्कायमेटकडून यंदाचा मान्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर भारतीय हवामान विभागाकडून यंदाचा मान्सून सर्वसाधारण राहण्याचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी उत्तरेकडे जूनपर्यंत उष्ण हवामान कायम राहण्याचा अंदाज, त्यामुळे पेरणीला देखील उशील होऊ शकतो. वेगारीस आॅफ द वेदरकडून केरळात मान्सून उशिरा दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 4 जूनपर्यंत मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रात 9 तारखेपर्यंत आणि मुंबईत 15 जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होणार असल्याचं भाकित वेगारीस ऑफ द वेदरने वर्तवलं आहे.